Breaking News

माण तालुक्यात खरीप हंगामाची 29 कोटी रुपयांची भरपाई

सातारा, 13 - दुष्काळामुळे खरिप हंगाम वाया गेलेल्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी नुकसान भरपाई म्हणून 29 कोटी 56 लाख 57 हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व गावांचा समावेश आहे. पात्र शेतकर्‍यांनी आपल्या बँकेचे खाते क्रमांक संबंधित तलाठ्याकडे तातडीने द्यावेत, असे आवाहन तहसिलदार सुरेखा माने यांनी दिले. दरम्यान, 50 पैशापेक्षा पैसेंवारी कमी असलेल्या माण तालुक्यातील 106 गावातील शिक्षण घेत असलेल्या शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्कही माफ करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. 
माण तालुक्यात गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने सन 2015 मधील खरीप हंगाम वाया गेला होता. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांची हातची पिके जावून मोठे नुकसान झाले होते. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांच्या खरिप हंगामाच्या नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे. माण तालुक्यातील सर्व 106 गावातील पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्याने ही गावे खरीप हंगामातील नुकसान भरपाईस पात्र ठरली आहे. 
खरीप हंगामाच्या पिकांच्या भरपाईसाठी माण तालुक्यात 29 कोटी 56 लाख 57 हजार रुपयांचा निधी महसुल विभागाकडे पात्र झाला आहे. या मदतीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांनी राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खाते क्रमांक आपल्या गावच्या तलाठ्यांकडे देण्याचे आवाहन तहसिलदार माने यांनी केले आहे.