Breaking News

अनैतिक संबंधांना अडथळा ठरणार्‍या आईकडून पोटच्या मुलाचा खून

पुणे, 08 - अनैतिक संबंधांना अडथळा ठरणार्‍या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यात रविवारी उघड झाली. प्रियकराच्या साथीने तिने हे कृत्य केले. महत्त्वाचे म्हणजे मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह राहत्या घरीच पुरला. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस तसेच दिल्ली पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाची आई वरिता उर्फ ऋती (40 वर्ष) आणि तिचा प्रियकर युनुस रहमत अली (वय 33 वर्ष) अशी या आरोपींची नावे आहेत. दिल्लीत आजोबांसोबत राहणार्‍या निकोलसचे (13 वर्ष) या दोघांनी अपहरण केले होते. त्यानंतर मुलाचे आजोबा जोसेफ जॉल यांनी 2 सप्टेंबर 2015 रोजी दिल्लीच्या नेबसराई पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र निकोलसला पुण्यात घेऊन आल्याचे मुलगी ऋतीने सांगितले आणि नातवाचे आजोबांशी बोलणे करुन दिले. निकोलस सुखरुप असल्याचे कळल्यानंतर आजोबा निश्‍चिंत होते.
यानंतर निकोलससोबत ख्रिसमसाठी दिल्लीत येत असल्याचे ऋतीने सांगितले. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी युनुस अलीने आजोबांना कॉल करुन, निकूने आत्महत्या केली असून त्याच मृतदेह राहत्या घरीच पुरल्याचे सांगितले. या कॉलमुळे आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांने दिल्ली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.आरोपी ऋती आणि अली काही महिन्यांपूर्वी बेंदवाडी इथे राहण्यास आले होते. मात्र 19 डिसेंबरपासून ते फरार होते. शिवाय घराचा दरवाजा बंद असल्याने मुलाचा खून झाल्याचा संशय बळावला. अखेर रविवारी सकाळी हडपसर पोलिस, दिल्ली पोलिस, नायब तहसीलदार, पंच साक्षीदार, कमांड 
हॉस्पिटलच्या डॉक्टर पथकासह घरातील दिवाणाखालची फरशी काढली. त्याखाली खोल खड्ड्यात निष्पाप निकोलसचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.