‘सातवे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन 2016’ यंदा पुण्यात
पुणे (प्रतिनिधी)। 10 - ग्लोबल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च ट्रस्ट द्वारे संपूर्ण राज्यभरात विविध शहरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर ‘स्टडी सर्कल’ या संस्थेमार्फत युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते आहे या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आज राज्यभरातील अनेक युवकांना झाला आहे. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन व्हावे ही त्यांचीच संकल्पना गेल्या 6 वर्षांपासून यथार्थपाने राबवली जात असून लक्षावधी युवक यातून लाभान्वित होत आहेत.
‘सातवे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन 2016’ यावर्षी पुण्यात होणार आहे. ग्लोबल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च ट्रस्ट व स्टडी सर्कल तर्फे दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी टिळक स्मारक सभागृह येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलानाच्या अध्यक्षपदी एमपीएससीचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे आहेत, तसेच स्वागताध्यक्ष साधनाचे संपादक विनोद शिरसाठ हे आहेत. 13 फेब्रुवारी सकाळी 7:30 वाजता ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. ग्रंथदिंडीचे उदघाटन साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्टे होणार असून, जोगेश्वरी मंदिर येथुन सुरु होणारी ग्रंथदिंडी संमेलन स्थळापर्यंत म्हणजेच टिळक स्मारक सभागृहापर्यंत असणार आहे. या दिंडीमध्ये विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच वारकरी पथक, लेझीम पथक इत्यादी दिंडीची शोभा वाढवणार आहेत. या दोन दिवसीय संमेलानाचे उदघाटन सकाळी 10 वाजता होणार आहे.
त्याचप्रमाणे, उद्घाटन समारंभामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल विविध व्यक्ती व संस्थांचा गौरव केला जाणार आहे आहे. तसेच, संस्थेतील काही एमपीएससी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा गौरव आणि ‘आदर्श प्रशासक’ हे पुरस्कार समारोप समारंभाच्यावेळी दिले जाणार आहेत.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी.पी. अग्रवाल, परिवहन आयुक्त श्याम वर्धने, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोपटराव पवार, शेखर गायकवाड, रंगनाथ नाईकडे, कृष्णात पाटील, डॉ. सागर डोईफोडे, प्राजक्ता लवंगारे, कालीचरण खरताडे, चंडीगडचे कलेक्टर अजित जोशी, डॉ. अनिल अवचट, श्यामसुंदर पाटील, अजय वैद्य, आदी मान्यवर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या संमेलनात संपूर्ण दोन दिवस विविध विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद, सनदी अधिकार्यांचे अनुभव कथन, प्रशासकीय अधिकार्यांचे कथाकथन व कवी संमेलन; तसेच प्रशासकीय अधिकार्यांच्या ‘सांस्कृतिक कट्ट्याचे’ आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत निमंत्रक डॉ. आनंद पाटील यांनी दिली. तसेच, हे संमेलन युपीएससी परीक्षेत विद्यार्थी प्रथम क्रमांकाने यशस्वी व्हावा या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे म्हणून अधिकाधिक युवकांनी याचा लाभ घ्यावा. अशी भावना स्वागताध्यक्ष विनोद शिरसाठ यांनी व्यक्त केली.
पत्रकार परिषदेत या संमेलनाबद्दल माहिती देताना संमेलनाचे निमंत्रक डॉ. आनंद पाटील म्हणाले की इतर साहित्य संमेलानाच्या तुलनेत हे साहित्य संमेलन अधिक प्रासंगिक आहे. आज महाराष्ट्रात लक्षावधी युवकांमध्ये स्पर्धा परीक्षा साहित्याचे वाचन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्या गरजू युवकांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, तसेच अनुभवी सनदी अधिकार्यांचे मार्गदर्शन मिळावे, याशिवाय ग्रंथ दालनातील विविध स्पर्धा परीक्षा साहित्याची त्यांना ओळख व्हावी या हेतूने हे संमेलन आयोजित केले जाते. यंदाचे साहित्य संमेलन हे पुण्यात होणार असून असंख्य युवकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
संमेलानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल; शिवाय या संमेलनातील चर्चा सत्राच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळी चर्चा साधता येणार आहे. या संमेलानासाठी प्रवेश विनामुल्य असणार आहे. तसेच स्टडी सर्कलची पुस्तके 50% सवलतीच्या दरामध्ये व इतर प्रकाशनाची पुस्तके सवलत दरामध्ये मिळणार आहेत.