Breaking News

नाशिकला 20, 21 फेब्रुवारीस पहिले सायकल कार्निव्हल

नाशिक/प्रतिनिधी। 14 -  सायकल टुरिझम वाढविण्यासाठी नाशिकमध्ये पहिले सायकल कार्निव्हल 20 व 21 फेब्रुवारीला होणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे दीडशे किलोमीटर सायकलिंग केले जाणार असून, सोबत विविध उपक्रम राबविले जातील.
नाशिक परिसरात राज्याची शान असलेल्या सह्याद्री पर्वतरांगा, तसेच सर्वांत जास्त धरणे नाशिकमध्येच आहेत. सुंदर रस्ते, आल्हाददायी वातावरण याचा उपयोग करून सायकल टुरिझम सुरू व्हावे. हिमालयात ज्याप्रमाणे देश-विदेशातून पर्यटक सायकलिंगसाठी येतात, त्याप्रमाणे नाशिकमध्येही सायकल टुरिझमला चालना देण्यासाठी सायकल कार्निव्हल घेणार असल्याची माहिती विशाल उगले यांनी दिली. सायकलपटूंना, हौशी सायकलिस्टला पर्यटनासाठी छोटे-छोटे घाट, पाटाच्या बाजूचे रस्ते, चढ-उतार व डोंगरदर्‍या या गोष्टींची गरज असते. ते सर्व नाशिकच्या सभोवताली असल्याने या पहिल्या कार्निव्हलची अनेकांना उत्सुकता आहे, असे श्री. उगले, मुकेश ओबरॉय, विकास लाते, प्रसन्ना पाटील, नाना फड व नंदू देसाई यांनी सांगितले. 
येत्या 20 तारखेला नाशिकमधून सायकलिस्ट देवळाली कॅम्पमार्गे भगूर, पांढुर्ली येथे हॉटेल केशरबंग येथे नाश्ता करतील.
 त्यानंतर पुढे टाकेद शिवतीर्थ मंदिर बघून कळसूबाईच्या पायथ्याजवळ जंगलात जेवण करतील. यानंतर इगतपुरी येथे व्यंकटेशनगर येथे रात्री साहसी उपक्रम करून तेथेच तंबूत मुक्काम करतील. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 21 ला घोटी-कावनईमार्गे शेवगेडांग येथे ड्रमिस्टिक लगून येथे सकाळी नाश्ता करतील. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वरकडे रवाना होत हॉटेल एमएच- येथे जेवण करून शुभम वॉटर पार्क येथे थांबतील. येथून निघून यॉर्क वायनरीज्ला भेट देतील. अशा प्रकारे दोन दिवसांत सुमारे दीडशे किलोमीटर अंतर पार करून सायकलिस्ट नाशिकला परततील.