Breaking News

नामपूरला विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

नाशिक/प्रतिनिधी। 14 -  विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा जागृत राहील यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन नामपूर केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक पवार यांनी केले. अध्यक्षस्थानी एम. जी. कापडणीस होते.
प्रारंभी मेळाव्याचे स्वरूप, अपूर्व विज्ञान मेळाव्याचे महत्त्व याविषयी अलई विद्यालयाच्या मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांनी माहिती दिली. मेळाव्यात परिसरातील बारा शाळांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक शाळेतून दहा वैज्ञानिक उपकरणांचा सहभाग होता. यावेळी या मेळाव्यात सहभागी विज्ञान उपकरणांच्या पाहणीसाठी परिसरातील  शाळांतून विद्यार्थी व शिक्षकांनी भेट देऊन उपकरणांची माहिती व त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेतला.मेळाव्यात पेपर का उडतो, हवेच्या दाबाने फुगा फुगतो, बाटलीने मेणबत्ती विझते, पाण्यात पेन्सिल कापलेली दिसते, पाण्याच्या साहाय्याने पैस गायब करणे, पेपर हातावर तसाच राहणे, बाटलीपासून बनवलेला शॉवर आदि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करणार्या उपकरणांची येथे मांडणी करण्यात आली होती. मेळाव्यात नामपूर मराठा हायस्कूल, अलई विद्यालय, अंबासन, जनता विद्यालय टेंभे, माध्यमिक विद्यालय, चिराई, आश्रमशाळा तळवाडे भामेर, माध्यमिक खिरमाणी, रातीर, बिजोरसे, सारदे आदि शाळांनी उपकरणांची मांडणी केली होती. या प्रसंगी एम. जी. कापडणीस, स्नेहलता नेरकर, उपमुख्याध्यापक बी. एस. देवरे, आर. सी. पाटील आदिंनी मार्गदर्शन केले. ए. डी. पगार यांनी आभार मानले.