जिल्ह्यात लोकअदालतींमध्ये 1140 प्रकरणे निकाली ः 1 कोटी महसूल जमा
सांगली, 15 - सांगली मिरजेतील जिल्ह्यातील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बँक, सहकारी संस्था, दिवाणी, दूरसंचार व महापालिका विभागाची अकराशे चाळीस प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आली. यातून सुमारे एक कोटी चार लाखाचा महसूल जमा झाला. प्रधान जिल्हा व सत्रन्यायाधीश एस.पी. तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत झाली.
सांगली, मिरज व सर्व तालुक्यांच्या न्यायालयात एकाचवेळी लोकअदालत सुरु झाली.
यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, वित्तीय संस्था, सहकार, दिवाणी, फौजदारी, दूरसंचार कंपन्या, ग्रामपंचायत विभागाची, तसेच वैवाहिक हक्क अशी सुमारे 18 हजार 955 प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयात प्रलंबित असलेली 597 प्रकरणे ठेवली होती. पॅनेलप्रमुख म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश शेगावकर, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश सौ. गारे, प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एच. आर. जाधव, श्रीमती एम.आर. यादव, श्रीमती जे. एस. यादव यांनी पॅनेलप्रमुख म्हणून काम पाहिले. समन्वयक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार कडणे, विजय कोगनोळे, अॅड. शोभा चव्हाण, एस.एम. यादव, एस.आर. कवठेकर, पी.एम. बेंद्रे, श्रीमती सीमा बनसवडे, जयश्री पेंडसे, राजकुमार पाटील, विजय गाडेकर यांनी काम पाहिले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व दिवाणी न्यायाधीश डी. एस. देशमुख, अधीक्षक सौ. व्ही. व्ही. कुलकर्णी, एस.आर. भालकर आदी उपस्थित होते.