किसान सभेतर्फे जेलभरो आंदोलन
सांगली ः दि. 21 - रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत. या शेतकर्यांंना एकरी 50 हजार रूपयांचे अनुदान द्यावे. दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये चारा, पिण्याच्या पाण्याची सोय आणि मजुरांना रोजगार आदी मूलभूत सुविधा तातडीने सुरु करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा, आशा वर्कर्स युनियन आणि जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगलीत जेल भरो आंदोलनाचा प्रयत्न झाला. पोलिसांनी सुमारे दीडशे कार्यकर्त्यांना अटक करून लगेच सोडून दिले.
किसान सभेचे उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, मीना कोळी, सुरेखा जाधव, हणमंत कोळी, रेहाना शेख, रियाज जमादार, दिलशाद टीनमेकर, कुमार सकळे, सुधीर गावडे, गुलाब मुलाणी, दिलीप शुक्ला, दीपक शिरगावकर, बेबी जोहरा नदाफ, बिस्मिल्ला शेख, अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौकातून आंदोलनास सुरुवात झाली. राजवाडा चौकात आंदोलक आल्यानंतर पोलिसांनी त्यांना तेथेच अडवून अटक केली. त्यानंतर लगेच त्यांना सोडून देण्यात आले.
अटक करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. आंदोलकांच्यावतीने पोलिसांच्या निषेधाचीही जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. आंदोलकांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देऊन, दुष्काळी तालुक्यातील सर्व शेतकर्यांची कर्जे माफ करा, वनजमीन व देवस्थान जमीन कसणार्या शेतकर्यांच्या नावे कराव्यात, दुष्काळी भागामध्ये पाणी, चार्याची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यामध्ये केली.