Breaking News

एफआरपी मागणीसाठी 1 फेब्रुवारीला साखर कारखाना अध्यक्षांच्या घरासमोर शंखध्वनी


सांगली ः दि. 21 - सध्या साखरेचा दर 3100 रुपये क्विंटल झाला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी 31 जानेवारीअखेर एकरकमी एफआरपी द्यावी, अन्यथा 1 फेब्रुवारीला कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले की, ऊस गाळपास गेल्यानंतर चौदा तासात कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार सर्व रक्कम देणे बंधनकारक आहे. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समिती गठित केली आहे. या समितीच्या तीन बैठका झाल्या असून त्यामध्ये क्षेत्रीय यांनी, कायद्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः कायदेतज्ज्ञ असूनही, त्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करुन कायदा मोडला आहे. हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. 
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही साखर कारखान्यांनी तोडणी व वाहतुकीचा बोगस खर्च दाखवून एफआरपीच कमी दाखविण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या या प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषी कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे. सध्या साखरेचा 3100 रुपये क्विंटल झाला आहे. एक टन ऊसापासून 120 किलो साखर तयार होत असून, त्यापासून 3720 रुपये कारखानदारांकडे उपलब्ध होत आहेत. 
याशिवाय बगॅस आणि मोलॅसिसपासून टनामागे 700 रुपये उपलब्ध होणार आहे. एक टन ऊसापासून कारखान्याला सुमारे 4400 रुपये मिळणार आहेत. बँक आणि कारखान्याकडील उत्पादन खर्च वजा जाता शेतकर्‍यांना देण्यासाठी कारखान्याकडे 3100 रुपये शिल्लक राहत आहेत. याचा विचार करुन कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यावी. कारखानदारांनी ती 31 जानेवारीपर्यंत दिली पाहिजे, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून कारखानदारांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.