Breaking News

रोहित वेमुलाच्या शवविच्छेदन अहवालाकडे देशाचे लक्ष -- आज केंद्र सरकारला अहवाल सोपवणार

हैदराबाद, 21 -  रोहित वेमुलाच्या आत्महत्येचा शवविच्छेदन अहवाल आज येणार आहे. तपास यंत्रणा हा अहवाल आज केंद्र सरकारला सोपवणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या दोन सदस्यीय टीमने हैदराबादमध्ये जाऊन रोहितच्या आत्महत्येचा तपास पूर्ण केला आहे.
रोहित वेमुलाने रविवारी संध्याकाळी विद्यापीठातील हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. राजकीय दबावापोटी ही आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याविरोधात केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून विद्यार्थी त्यांच्या राजीनाम्यावर अडून बसले आहेत. केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी स्मृती इराणींना पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. दलित असल्यामुळे रोहित वेमुला याला भेदाभेदीची वागणूक दिल्याचे म्हटले जाते. त्यानंतर रोहितने रविवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र
दत्तात्रेय यांनी त्या पत्राचा आत्महत्या केलेल्या रोहितशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.