भिंगार अर्बन बँक निवडणुक चार जणांची बिनविरोध निवड
अहमदनगर ।प्रतिनिधी । 20 - येथील भिंगार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागेसाठी 20 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये महिला राखीवच्या दोन, इतर मागासवर्गीय, अनु. जाती व जमाती अशा एकूण चार जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या चारही जागा बिनविरोध झाल्या आहेत.
संचालक मंडळाच्या 15 जागेसाठी 12 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सर्वसाधारण दहा जागेसाठी चौदा अर्ज दाखल झाले आहेत. राखीवमध्ये भटक्या जमातीच्या एका जागेसाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्गीय एका जागेसाठी गोपाळराव माधवराव झोडगे यांचा एकमेव, तर महिला राखीवच्या दोन जागांसाठी तिलोत्तमा पोपट करांडे, कांताबाई शिवराम फुलसौंदर आणि अनुसूचित जात-जमातीमधून एकनाथ रतन जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या चारही जागा बिनविरोध झाल्या आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी सोमवारी झाली. त्यामध्ये एक अर्ज बाद झाला, तर एका अर्जावर आक्षेप घेण्यात आला. यामध्ये दहिहंडे यांनी लंगोटे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. त्यावर मंगळवारी निर्णय होणार आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी 19 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत असणार आहे. गेल्या 35 वर्षात पाच वर्ष वगळता गोपाळराव झोडगे यांचेच बँकेवर वर्चस्व राहिले आहे.