Breaking News

जि.प.स्थायी सभेत शिक्षण व आरोग्याच्या कामकाजावर पदाधिकार्‍यांनी नाराजी


 अहमदनगर । प्रतिनिधी । 20 -  जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत प्राथमिक शिक्षण व आरोग्य समितीच्या कामकाजावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षण विभागातील बदल्यांमधील घोळ, आरोग्य विभागाच्या भरतीमधील गोंधळ आणि दूषित पिण्याच्या पाण्यावरून सदस्य सुजीत झावरे आणि राजेंद्र फाळके यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी या दोन्ही विभागाच्या कामकाजाची दखल घेण्याची मागणी झावरे यांनी केली. 
सोमवारी मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, नंदा वारे आणि मीरा चकोर यांच्यासह सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते. 
यावेळी झावरे यांनी पुन्हा शिक्षण विभागातील हंगामी बदल्यांचा विषय उपस्थित केला. या विषयावर चर्चा होवून दोन दिवसांत शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी अध्यक्षा मंजूषा गुंड आणि झावरे यांना लेखी अहवाल देणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाच्या भरतीत मोठा गोंधळ झाला असल्याचा आरोप फाळके यांनी केला. भरतीत निवड झालेल्या कर्मचार्यांना आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी संपर्क करून त्यांची आर्थिक पिळवणूक केली असल्याचे स्थायी समिती सभागृहाला सांगण्यात आले. याप्रकरणी तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचे नवाल यांनी सांगितले. क वर्ग तीर्थक्षेत्र कार्यक्रमांतर्गत अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील अंबिका माता मंदिराच्या विकास कामासाठी 29 लाख 99 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.