Breaking News

अदितीच्या नृत्यविष्काराने उपस्थितांची मने जिंकली

अहमदनगर ।प्रतिनिधी। 20 - कत्थक व शास्त्रीय संगीताचा उगमापासून आजपर्यंतचा प्रवास नृत्याच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध कत्थक नृत्यांगना व चित्रपट कलाकार आदिती भागवत यांच्या कलाविष्काराने नटलेला ‘आवर्तन’ हा नृत्य सोहळा आय.एम.एस. व्हिडीओकॉन अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त माउली सभागृहात संपन्न झाला. यावेळी डॉ.भा.पा. हिवाळे संस्थेचे श्री. विशाल बर्नबस,माजी सचिव फिलिप्स बार्नबस , आयएमएस चे डॉ. शरद कोलते, डॉ. एम.बी. मेहता, प्राचार्या सौ. माधवी सराफ  व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पुरातन काळात मंदिरात उगम झालेल्या कत्थक नृत्य शैलीची विविध रूपे, चित्रपट सृष्टीतील प्रवेश, फोक डान्स व लावणीत कत्थक शैलीचा वापर व आजच्या आधुनिक काळात फ्युजनमधून संगीताशी बसविलेला ताळमेळ याचे विलोभनीय दर्शन सहकलाकारांसह नृत्यांगना आदिती भागवत ने सादर केले. कत्थक व सुफी गीतांचा मिलाप व कथा रचनावर आधारित नृत्याचा आनंद या सर्व नृत्य प्रवासातून मिळालेल्या अनुभवातून आदितीने सादर केला. 
या नृत्य प्रयोगाचे अमेरिकेत एकल विद्यालयासाठी 35 प्रयोग आदितीने सादर केले असून त्यातून उत्तम निधी संकलन केला आहे. या नृत्याचे मुंबई, कल्याण, पुण्यानंतर नगरमधील या कार्यक्रमास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्राचार्या सौ.माधवी सराफ यांनी आदिती भागवत चा परिचय करून दिला. आदिती भागवत बरोबरच सहनृत्यांगना स्मिता वेताळे, मनाली कुलकर्णी, तनुजा सरोदे यांच्यासह वाद्य कलाकार हार्मोनियम- वैभव मंकड, जम्बे व ड्रम वादक- शिखरनाद कुरेशी, तबला- स्वप्नील भिसे, बासुरी- शशांक आचार्य, मेकअप व हेअर स्टायलिस्ट- विमल सालियन, प्रोडक्शन मॅनेजर- विकी ठाकूर यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बाळासाहेब गांधी, श्री व सौ. श्रीगोपाल धूत, श्री.व सौ. मोहनशेठ मानधना, सौ. सविता फिरोदिया , न्युआर्टचे प्राचार्य झावरे व  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. एम.बी. मेहता यांनी मानले.  प्रसिद्ध कत्थक नृत्यांगना व चित्रपट कलाकार आदिती भागवत यांच्या कलाविष्काराने नटलेला ‘आवर्तन’ हा नृत्य सोहळा आय.एम.एस. व्हिडीओकॉन अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त माउली सभागृहात संपन्न झाला.