Breaking News

रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्याची गरज राज्यपालंचे प्रतिपादन


पुणे (प्रतिनिधी), 12 - विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता रोजगारक्षम बनवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबूकस्वार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे आदी उपस्थित होते.
राज्यपाल राव म्हणाले, आपल्या देशात उच्च शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकीकरण झाले आहे. पण गुणात्मक दर्जा उंचावण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी पदवीधर होतो. पण तो रोजगारक्षम नसतो. देशात सध्या बेरोजगारी ही समस्या राहीलेली नसून रोजगारक्षम तरूण मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. 
नोकरीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये सध्याच्या तरूण पिढीकडे नसल्याची खंत उद्योग समूहाकडून केली जाते, असे सांगून राज्यपाल राव म्हणाले, शिक्षण संस्थांनी उद्योगांच्या सहकार्याने त्यांना कोणती कौशल्ये असणारे विद्यार्थी हवे आहेत याचा अभ्यास करून त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निश्‍चित करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढीस लागेल आणि उद्योगसमूहांनाही त्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ मिळेल.
शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांत उद्योजकता आणि नाविन्याचा ध्यास घेण्याची वृत्ती जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नोकर्‍या मागणारे पदवीधर संस्थेतून बाहेर पडण्याऐवजी नोकर्‍या देणारे उद्योजक घडविण्यात शिक्षण संस्थांनी  पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल राव यांनी केले. 
यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्रीमती सुप्रिया सुळे यांचेही भाषण झाले. श्री. हर्षवर्धन पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. ज्ञानेश्‍व लांडगे यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. श्री. काझी यांनी आभार मानले. यावेळी  श्रीमती पद्मजा भोसले, एआयसीटीईचे अध्यक्ष ए.डी. सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.