आमदार निधी कामात गोलमाल ः साखळकर
सांगली, 12 - आमदार निधीतून सुशिक्षित बेरोजगारांसाठी काढण्यात आलेल्या कामात हॉटमिक्सची अट घालून या बेरोजगारांना वंचित ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. या अटींमुळे कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक गोलमाल झाला असून, अट रद्द न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. ते म्हणाले की, चालू वर्षात आमदार निधीतून काही कोटींची कामे प्रस्ताविक केली आहेत. कामाच्या निविदेत हॉटमिक्स फ्लॅँटची अट घातली आहे. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नव्हता. त्याला निविदा मॅनेज करण्याचा वास येत आहे. या अटीमुळे आमदार निधीतील कामापासून सुशिक्षित बेरोजगार वंचित राहणार आहे. काही मर्जीतील हॉटमिक्स ठेकेदारांना कामे देण्याचा घाट घातला आहे.या कामांची फेरनिविदा काढावी, अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही साखळकर यांनी दिला आहे.