उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘आंतरधार्मिक संवाद’ विषयावर परिषद
अमळनेर/प्रतिनिधी। 10 - वाढता दहशतवाद, धार्मिक उन्मादाचे उच्चाटन करण्यासाठी तत्त्वज्ञान आणि धर्म यांनी हातात हात घालून संवादाचे काम केल्यास निश्चितच शांतता आणि एकोपा निर्माण होईल, असे प्रतिपादन श्रीनगरच्या काश्मीर विद्यापीठातील इस्लामिक अध्ययन केंद्राचे सेवानवृत्त संचालक प्रा.हमीद नसीम रफियाबादी यांनी केले.
उमविच्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात ’आंतरधार्मिक संवाद’ या विषयावर सुरू झालेल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना प्रा.रफियाबादी बोलत होते. कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर बौद्ध धर्माचे अभ्यासक भदन्त विमलकीर्ती, केंद्राचे मानद संचालक प्रा.सुनील गरुड होते.
भारतातील सर्वात जुन्या असलेल्या प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे शताब्दी वर्ष सुरू असून त्यानिमित्त या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा.हमीद रफियाबादी म्हणाले की, आशिया खंडातील तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव जगावर पडलेला आहे. असे असतानाही आपल्याला पाश्चिमात्य देशांचे आकर्षण वाटते. येथील तत्त्वज्ञान परंपरा जाणून घेण्यासाठी विदेशातील अभ्यासक भारतात येतात; आपण मात्र जात, धर्म, प्रांत, भाषा अशा वादात अडकून पडलो आहोत. भारताकडे जग मोठया आशेने बघत असल्यामुळे त्या देशातील तत्त्वचिंतकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. ती जबाबदारी आपण पार न पाडल्यास येणार्या पिढीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम म्हणाले की, जगण्याचे मूळ तत्त्वज्ञान आनंददायी असे आहे. भारताची स्नेह आणि परस्पर आदर राखण्याची परंपरा आहे. आंतरधार्मिक संवादाची प्रक्रिया सुरू झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. युद्ध हे काही उत्तर नव्हे. येत्या काळात बौद्धिक भांडवलावर व्यक्तीची ओळख निर्माण होणार आहे.
श्रीमंत प्रतापशेठ यांनी शंभर वर्षांपूर्वी तत्त्वज्ञान केंद्र सुरू करून जी दूरदृष्टी दाखविली त्याबद्दल प्रा.मेश्राम यांनी कौतुकोद्गार काढले. तत्त्वज्ञान केंद्राच्या विभागप्रमुख प्रा.अर्चना देगावकर यांनी प्रास्ताविक केले. संदीप केदार यांनी सूत्रसंचालन केले.