Breaking News

शासकीय रूग्णालयातील शुल्कवाढ मागे घ्यावी-शिराळे


बीड,दि.12 -  शासकीय रूग्णालयामध्ये उपचारासाठी सरकारने शुल्क वाढीचा निर्णय घेतला असून सदरचा निर्णय हा कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांना अत्यंत त्रासदायक असून शुल्कवाढीच्या या निर्णयाने सर्वसामान्यांना शासकीय रूग्णालयातही उपचार घेणे आता परवडणे शक्य नाही. सध्याची स्थिती ही दुष्काळी असून या स्थितीमध्ये शुल्कवाढ हा निर्णय लोकांना परवडणारा नसल्यामुळे हा निर्णय सरकारने पाठीमागे घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांनी केली आहे. 
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवनाथ शिराळे यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुष्काळ आहे. गेल्या तीन वर्षापासुन कमी पाऊस झाल्याने राज्यासह मराठवाड्यातला सर्वसामान्य गोरगरीब हा आर्थिक अडचणीत आहे. अशी स्थितीत शासकीय रूग्णालयात शासनाने शुल्क वाढीचा निर्णय घेणे हे सर्वसामान्य, गोरगरीबांवर एका प्रकारे अन्याय आहे. शवविच्छेदनापासुन ते एका इंजेक्शनपर्यंत शुल्कवाढ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. सरकारने जी शुल्कवाढ केली आहे ती सर्वसामान्य नागरीकांना परवडणारी नाही.ग्रामीण भागातील गोरगरीब,शेतकरी, शेतमजुर, दिनदुबळे, छोट्या मोठ्या आजारासाठी शासकीय रूग्णालयाचा आधार घेतात. आणि या ठिकाणी साधी चिठ्ठी काढण्यापासून इंजेक्शन घेण्यापर्यंत 100 ते 125 रूपये खर्च येत असेल तर या गोरगरीबांनी जायचं कुठं. सरकारकडून परवडणारी नसून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. सध्याच्या स्थितीमध्ये  ही शुल्कवाढ सरकारने मागे घ्यावी आणि सर्वसामान्य नागरीकांना कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळे, गोरगरिबांना आधिकार देणे गरजेचं आहे. असं म्हणत नवनाथ शिराळे यांनी शासकीय रूग्णालयामधून गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा देण्याचं धोरण सरकारने आखायला हवं. ते धोरण आखाताना सर्वसामान्यांना साध्या आजारापासून दिर्घ आजाराच्या रोगांचा उपचार मोफत होणे ही आजच्या परिस्थितीची खरी गरज ओळखूप सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनाथ शिराळे यांनी केली आहे.