अतिक्रमणावर रात्रीहि कारवाई
सांगली, 10 - कारवाईच्या भीतीने दिवसभर गायब झालेले विक्रेते, हातगाडीवाले सायंकाळनंतर मात्र पुन्हा रस्त्यावर येतात. त्यासाठी आता सायंकाळी सहा ते नऊ या वेळेतही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. गेल्या दोन आठवड्यात महापालिकेच्या पथकाने सांगलीत 928, तर मिरज व कुपवाडमधील 466, अशी 1394 अतिक्रमणे हटविली आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे. सांगलीच्या बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविल्यानंतर आता पथकाने शंभरफुटी रस्ता मोकळा करण्याची कारवाई हाती घेतली आहे. महापालिकेच्या पथकाने मोकळे केलेल्या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली आहेत. सकाळी पथक अतिक्रमण काढलेल्या मार्गावरून जाते. तेव्हा रस्त्यावर हातगाडी, फळे, भाजी विक्रेते गायब असतात. पथक पुढे जाताच पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडलेला असतो. दिवसभर गायब असलेले हातगाडी, फेरीवाले सायंकाळनंतर मात्र रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी महापालिकेच्या अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा आढावाही घेण्यात आला. सायंकाळनंतर होणार्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश गायकवाड यांनी दिले आहेत.
सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हे पथक शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे.
महापालिकेच्या पथकाने शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमण हटावचा धडाका कायम ठेवला होता. दिवसभरात अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. रस्त्यावरील ठिकाणच्या मातीचे भराव जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारी सहा वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविली. त्याशिवाय डिजिटल फलक, लोखंडी साहित्य, हातगाडी, स्लॅब, कट्टे, गटार व रस्त्यावरील छपर्या हटविण्यात आल्या.