चांदोलीचे पाणी मोरणेत सोडण्याचा निर्णय
सांगली, 10 - शिराळा तालुक्यातील मोरणा धरणात केवळ 0.2 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मोरणा नदीत पाण्याचा मोठा तुटवडा भासत आहे. चांदोलीचे पाणी तातडीने सोडण्यात यावे, यासाठी आज आमदार शिवाजीराव नाईक यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह अधिकार्यांची बैठक घेतली. यामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार नाईक, जिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांच्या उपस्थिती पाटबंधारे, कृष्णा खोरे महामंडळ आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये थकीत पाणीपट्टी असल्याचा मुद्दा अधिकार्यांनी काढला. मात्र योजनेतील 65 टक्के शेतकर्यांनी पैसे भरले असून उर्वरित 32 लाख 46 हजार रुपयांच्या पाणीपट्टीची वसुली पाटबंधारे विभागाने करावी, अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्याचे रणधीर नाईक यांनी सांगितले.
पाणीपट्टी दरात अडीचपट वाढ झाल्याबद्दल आमदार नाईक यांनी विचारणा केली. मात्र अधिकारी त्याचे कारण सांगू शकले नाहीत. वीज दरात दीडपट वाढ झाली असताना पाणीपट्टी इतकी वाढ झाली असताना पाणीपट्टी इतकी का वाढली त्याचा पुन्हा अभ्यास करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी गायकवाड यांनी केल्याचे रणधीर नाईक म्हणाले.