Breaking News

पालिकेचे वस्तुनिष्ठ बजेट करा ः जिल्हाधिकारी


सांगली, 10 - महापालिकेच्या बलून अंदाजपत्रकाला जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी चालू वर्षात चाप लावण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी महापालिका अधिकार्‍यांच्या बैठकीत, उत्पन्न बघूनच खर्चाचे नियोजन करुन वस्तुनिष्ठ अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश गायकवाड यांनी दिले. येत्या उत्पन्न व खर्चाचा अहवाल देण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गायकवाड यांच्या उपस्थितीत पालिका अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला उपायुक्त सुनील पवार, सुनील नाईक, सहायक आयुक्त रमेश वाघमारे, टीना गवळी, नगरसचिव चंद्रकांत आडके, प्रशासन अधिकारी नकुल जकाते यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत महापालिकेच्या अंदाजपत्रकावर चर्चा झाली. 
गायकवाड यांनी 2015-16 चे दुरुस्त अंदाजपत्रक व पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. ते म्हणाले की, यंदाच्या वर्षातील अंदाजपत्रकात 60 कोटीची तूट आहे. प्रत्येकवर्षी महापालिकेचे अंदाजपत्रक फुगलेले असते. अधिकार्‍यांनी उत्पन्न व खर्चाचा भेळ घालूनच अंदाजपत्रक तयार केले पाहिजे. केवळ आकडे फुगविण्यात समाधान मानता कामा नये.सर्वच खातेप्रमुखांनी खर्चाची बाजू पाहावी. पालिकेच्या उत्पन्नाइतकेच अंदाजपत्रक हवे. स्थायी समिती, महासभेने अंदाजपत्रकात वाढ केली, तर त्याची कामे सर्वात शेवटी करावीत.
 प्रथम प्रशासनाने शिफारस केलेली कामे प्राधान्याने करा, अशी सूचना केली. महापालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडे एलबीटीची सात ते आठ कोटीची थकबाकी आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करुन एलबीटी वसूल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. महापालिकेच्या खर्चासाठी आवश्यक निधी सोडून इतर रक्कम 29 दिवसांच्या मुदतीने बँकेत ठेव ठेवावी, असेही गायकवाड म्हणाले.