दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या हिंदुत्ववादी विचारधारेतून
मुंबई, प्रतिनिधी, दि. 23 - राज्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कर्नाटकमध्ये कलबुर्गी या तिघांची झालेली हत्या ही हिंदुत्ववादी विचारधारेतूनच झालेली आहे. ज्याप्रमाणे बांग्लादेश कट्टरतावादाच्या दिशेने गेला आहे, त्याचप्रमाणे आपणही कट्टर हिंदुत्ववादाच्या दिशेनेच जात असल्याचेच या तिन्ही हत्यांमधून स्पष्ट होत असल्याचे वक्तव्य इतिहासकार डॉ. रामचंद्र गुहा यांनी येथे केले.
पूर्वी आविष्कार स्वातंत्र्यावर बंदी घालण्यासाठी पुस्तकं जाळणे चित्रपट बंद पाडण्यासारखे प्रकार केले जात. आता मात्र थेट हत्या केली जात असल्याचा टोला गुहा यांनी लगावला. मुंबई विद्यापीठामध्ये दिवंगत लेखक विजय तेंडुलकरांच्या स्मरणार्थ डॉ. गुहा यांचे एट थ्रेट्स टू फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन इन इंडिया या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. भारतामध्ये लेखक आणि विचारवंतांना आविष्कार स्वातंत्र्य चीन आणि रशिया या देशांच्या तुलनेत अधिक आहे, मात्र स्वीडनसारख्या देशाच्या तुलनेत ती कमी असल्याचे वक्तव्य गुहा यांनी केले.
सरकारने आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या मुद्द्यावर यामध्ये डावं उजवं काहीही नसल्याचे सांगत गुहा यांनी सर्वच राजकीय पक्षांची हजेरी घेतली. काँग्रेसपासून शिवसेनेपर्यंत आणि पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांपासून दक्षिणेतील एआयडीएमकेपर्यंत सर्वांनीच वेळोवेळी बंदीचे हत्यार वापरून आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचे वक्तव्य त्यांनी केले. कायद्याची भीती दाखवत आविष्कार स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली जाते, यासाठी गुहा यांनी दोन उदाहरणे दिली. ते म्हणाले, दिनानाथ बात्रांनी वेंडी डॉनिगरच्या पुस्तकांवर कुठेतरी पंजाबमध्ये डेरा बासी या गावात केसेस दाखल केल्या होत्या, ज्यामुळे वेंडी डॉनिगरला त्या प्रकरणातून माघार घ्यावी लागली होती. तसेच चित्रकार एम. एफ. हुसेन यांना त्रास देण्यासाठी देशात वेगवेगळ्या ठिकाणी बारा केसेस दाखल केल्या होत्या, अखेरीस हुसेन देशात परत कधीच येऊ शकले नाहीत. विजय तेंडुलकरांविषयी आदर : विजय तेंडुलकर यांच्या लिखाणाविषयी आदर व्यक्त करीत तेंडुलकर राजकीय लिखाण करीत. पण, कोणत्याही पक्षाशी त्यांची जवळीक नव्हती, असे उद्गारही त्यांनी काढले. पत्रकारांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याच्या जवळकीचा ठपका लागण्यापासून दूर राहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.