Breaking News

भुजबळ हस्तकांचे पंख छाटण्याची निर्धार कृती -- सार्वजनिक बांधकाम : देबडवारांचे नागपूरला तर चव्हाणांचे एमएसआरडीसीत पुनर्वसन


 मुंबई/प्रतिनिधी । 18 - मुंबई साबां प्रादेशिक विभागासह तत्कालीन कार्यक्षेत्रात केलेल्या भ्रष्ट कर्तृत्वाचा हिशेब अखेर चुकता झाला आणि मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना नागपूर आणि अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना एमएसआरडीसीची हवा खाण्याची वेळ आली. शिशुुपालाच्या पापाचा घडा भरल्यानंतर त्याला त्याच्या कर्माची सजा मिळाली. साबांतील शिशुपाल म्हणून ओळखले जाणारे देबडवार आणि चव्हाण यांच्या बदली प्रकरणाकडेही याच नजरेतून पाहिले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साबांतील भुजबळ हस्तकांचे पंख छाटण्याचे काम हाती घेतले तरी बदली आणि बढती प्रकरणातील बहुचर्चित मुद्यांकडे गंभीरतेने पाहावे अशी अपेक्षाही साबांतून व्यक्त केली जात आहे.
सुंभ जळाला तरी वळ मात्र राखेतही स्पष्टपणे उमटलेले दिसतात. छगन भुजबळ सत्तेत नसले तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात असलेल्या त्यांच्या काही हस्तक वरिष्ठ अभियंत्यांच्या अस्तित्वामुळे या खात्यावरील भुजबळांची पकड मात्र अद्यापपावेतो कायम असल्याचे अगदी कालपरवाच्या क्लिन चिट अहवालातूनही सिध्द झाले. सत्तांतर होऊन या अभियंत्यांच्या मनात असलेली भुजबळी शैली त्यांच्या प्रत्येक कृतीतून उमटत आहे. सत्ता भाजपची असली तरी साबांच्या अजेंड्यावर भाजपच्या मंत्र्यांना मात्र दुय्यम स्थान राहिल अशीच कार्यपध्दती उल्हास देबडवार, अतूल चव्हाण, आर.आर.हांडे, किशोेर पाटील यांच्यासारख्या अभियंत्यांनी दुष्परिणाम सरकारच्या कार्यक्षमतेवर होऊ पहात होते.
भुजबळ क्लिन चीट अहवालाच्या निमित्ताने का होईना ही बाब साबांमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही लक्षात आली. अहवाल प्रकरणाला जबाबदार ठरवून उल्हास देबडवार आणि अतुल चव्हाण या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविले गेले. त्याचवेळी या त्रिमुर्तींमधील महत्वाचा दुवा असलेले अधिक्षक अभियंता आर.आर.हांडे हे मात्र अनावधानाने सुटले. सक्तीच्या रजेचा कार्यकाळ संपल्यानंतरही या माजी साबांमंत्र्यांच्या हस्तकांचे पुनर्वसन करतांना मुख्यमंत्री आणि साबांमत्र्यांनी ताकही फुंकून पिण्याचे ठरविल्याचे दिसते. मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या गृहदरबारात म्हणजे नागपूर महापालिकेत तर अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना एमएसआरडीसीत पदस्थापित करून खबरदारी घेतल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. उल्हास देबडवार यांना नागपूर महापालिकेत काम करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी दिली. यातून आणखी वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सकाळ दुपार संध्याकाळ देबडवारांच्या कार्यपध्दतीवर लक्ष ठेवण्यासाठीच ही सोय केल्याचे साबांत बोलले जात आहे. एमआरडीसीतही या पेक्षा वेगळी परिस्थिती नाही. साबांप्रमाणे एमआरडीसीत मनमानी करणे अतुल चव्हाण यांना शक्य होणार नाही. देबडवार आणि चव्हाण यांच्या साबांतील लॉबीला छेद देऊन साबांमध्ये अजूनही कार्यरत असलेल्या भुजबळ सद्दीला हद्दपार करण्याचा ठाम निर्धारच या कृतीतून व्यक्त होत असल्याचे साबांत बोलले जात आहे. दरम्यान, देबडवार आणि चव्हाण यांच्या या बदलीचे साबांतून उत्स्फूर्त स्वागत होत असले तरी मुख्यमंत्री आणि साबांमंत्र्यांनी आणखी सजग राहण्याची आवश्यकताही बोलून दाखविली जात आहे. देबडवार-चव्हाण लॉबीकडून बदली आणि बढती प्रकरणांमध्येही मोठा घोळ झाल्याची वाच्यता साबांत आहे. बदली आणि बढती प्रकरणांच्या फाईलमध्ये दडलेल्या कागदपत्रांची उभय मंत्र्यांनी गंभीरपणे शहनिशा केल्यास या चतुरांचे चातुर्यकर्मही चव्हाट्यावर येईल अशी साबांत कानोकानी आहे.