शाळेत मातृभाषा अनिवार्य हवी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड/प्रतिनिधी । 18 - सातत्याने इग्रंजी भाषेकडचा कल वाढत असला तरी, मराठी ही आपली मातृभाषा आहे,आणि ती आपण टिकवली पाहिजे. प्रत्येक शाळेत मातृभाषा अनिवार्य हवी. तसेच धोरणात्मक भूमिका घेताना हा विचार व्हावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. रविवारी सकाळी 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांची काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार, कवी फ.मु.शिंदे आणि प्रा.जनार्दन वाघमारे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. त्यावेळी मराठी भाषेच्या भवितव्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना शरद पवारांनी आपली ही भूमिका मांडली. शरद पवारांनी या मुलाखतीत मराठी भाषेबरोबरच, राजकारण, स्वतंत्र विदर्भ, साहित्या संबंधीच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. या मुलाखतीत शरद पवार यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. पवार यांची मुलाखत ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
पवार म्हणाले की, मराठी भाषेसाठी वेळप्रसंगी सक्ती करावी लागेल. राजकारणात सुसंस्कृत आणि सुसभ्य व्यक्तिमत्त्व असे यशवंतराव चव्हाण होते. राजकारणात सुसंवाद ठेवायचा कसा, हे चव्हाण साहेबांनी शिकवले. वैचारिक मतभेद असता कामा नये. मतभेद असावेत पण मनभेद असु नये, अशी त्यांची धारणा होती. मी अभ्यास सोडून बाकिच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचो. वेगळ राज्य हवे अशी मागणी होत आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा विषय घेऊन निवडणूक लढवितो, तो क्वचितच जिंकतो. पण लोकांनी याबाबत निर्णय घ्यावा, अशी माझी भूमिका आहे. मी दहावीला असताना त्याकाळी प्रत्येक विषयात 35 गुण मिळाले की सायकल मिळायची. मी तेच उद्दीष्ट ठेवले आणि मी ते पूर्ण केले. मला वृत्तपत्र काढायचे होते. मी प्रयत्न केला पण ते पूर्ण होऊ शकले नाही.
