Breaking News

वेमुलाच्या आत्महत्येनंतर देशात तीव्र पडसाद

हैदराबाद/ नवी दिल्ली, 20 -  हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येवरून राजकारण तापले आहे. भाजपचे सर्व विरोधक एकजूट होऊन स्मृती इराणी आणि बंडारू दत्तात्रेय या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. या दोघांनाच आत्महत्येसाठी जबाबदार मानले जात आहे. दरम्यान, साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी हैदराबाद विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट. पदवी परत करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून त्यांनी पुरस्कार परत केले आहेत.
काँग्रेसने दोन्ही मंत्र्यांना हटवण्यासाठी दबाव आणला आहे. राहुल गांधी हैदराबादेत पोहोचले आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची आणि रोहितच्या आईची भेट घेतली. राहुल म्हणाले, ‘कुलगुरू आणि दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांनी वेळीच कारवाई केली नाही. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. देशात बदल घडवू इच्छिणाऱ्या युवकाला एवढे दु:ख दिले की त्याच्याकडे आत्महत्येशिवाय पर्यायच उरला नाही. त्याने आत्महत्या केली, पण तशी परिस्थिती कुलगुरू, मंत्री आणि संस्थेने निर्माण केली.’ सायबराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी बंडारू दत्तात्रेय, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव इतर तिघांच्या विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
दिल्ली, मुंबई, पुण्यातही निदर्शने
याप्रकरणी हैदराबादसह दिल्ली, मुंबई, पुणे, औरंगाबाद चेन्नईसह अनेक शहरांत विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. तेलंगण युवा मोर्चाने दत्तात्रेय यांच्या घराबाहेर आंदोलन केले. पुणे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस उपोषण केले. गुजरात केंद्रीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गांधीनगरमध्ये निदर्शने केली.औरंगाबादेत विद्यापीठ बंद पाडण्यात आले.
केजरीवाल, तृणमूलचे खासदारही हैदराबादेत
विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही आत्महत्या नाही तर लोकशाही, सामाजिक न्यायाची हत्या आहे. मोदींनी मंत्र्यांना हाकलावे देशाची माफी मागावी. तृणमूलचे खासदारही हैदराबादेत पोहोचले.  
एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी कुलगुरूंच्या अटकेची मागणी केली आहे.