Breaking News

अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेले डोळे हसणार


मुंबई, प्रतिनिधी, दि. 18 - वंध्यत्वामुळे आई-वडील होणार्‍यां सुखापासून दूर राहिलेल्या दाम्पत्यांच्या आयुष्यात नवीन आशा पालवणारे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर वाडिया रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. ही सुविधा खासगी रुग्णालयात उपलब्ध असली तरी उपचार महागडे असल्याने आर्थिकदृष्टया कमकुवत जोडप्यांना ते परवडणारे नाहीत.
यामुळे वंधत्वावर उपचार करून घेणे त्यांना शक्य नसते. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात चांगले उपचार मिळावेत याकरिता आयव्हीएफ (इन-व्हिक्टो फर्टिलायझेशन) हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बाळाची प्रतीक्षा करणार्‍यां दाम्पत्यांना आशेचा नवा किरण मिळाला आहे. वंध्यत्वाची समस्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. मुंबईत 50 टक्के नवदाम्पत्यांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येत आहे. स्त्री-पुरुष दोघांपैकी कोणीही वंध्यत्वाचे शिकार होऊ शकतात. मात्र, मूल होत नसल्याने संबंधित व्यक्तीला प्रचंड मानसिक ताणातून जावे लागते. ही समस्या समाजातील सर्व पातळीवरील दाम्पत्यांना भेडसावते. पण याकरिता होणार्‍या तपासण्या, लागणारी औषधे, निदान, आणि उपकरणे या सर्वच गोष्टी महाग असल्यामुळे आर्थिक स्थिती सक्षम असलेली दाम्पत्ये खासगी रुग्णालयांना प्राधान्य देतात. पण गरीब दाम्पत्यांना हा महागडा उपचार परवडणारा नसल्याने ती उपचारांपासून वंचित राहतात. वाडिया रुग्णालयात 30 हून अधिक दाम्पत्य वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येतात. महिन्याला 100 हून अधिक रुग्णांवर आयव्हीएफच्या माध्यमातून उपचार केले जातात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयात स्वतंत्र आयव्हीएफ सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
उपचारांसाठी 50 टक्के सवलत : टेस्ट टयूब बेबीचा खासगी रुग्णालयात येणारा खर्च अडीच ते तीन लाख रुपये आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत दाम्पत्यांना हा खर्च परवडणारा नसल्यामुळे आता वाडिया रुग्णालयात या उपचारांसाठी  टक्के सवलत देण्यात आली आहे. तर दारिद्य्र रेषेखालील दाम्पत्यास उपचाराचा खर्च अजून कमी होईल.