पाऊस सरींसह गारपिटीचा इशारा!
मुंबई, प्रतिनिधी, दि. 18 - गायब झालेल्या थंडीने पुन्हा जोर धरला असून थंडीसोबत राज्यातील काही भागांत पावसाच्या तुरळक सरी आणि गारपीटही होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येते 24 तास उत्तर मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता असून कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. येते दोन-तीन दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात गारपीट होण्याची शक्यताही आहे. कनार्टक ते मध्य प्रदेशदरम्यान पूर्वेकडे द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने तुरळक पाऊस सरींसह गारपीट होईल, असा अंदाज कुलाबा प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकार्यांनी वर्तवला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उकाड्याने त्रस्त मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे काहीसे सुखावले आहेत. किमान तापमानाचा पारा 17 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावल्याने पहाटे व सायंकाळी गारेगार वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून कमाल तापमानात पाच ते सहा अंशांनी घट झाल्याने शहर, उपनगरात थंडीचा प्रभाव जाणवत आहे. येते काही दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. उत्तरेकडून येणार्या वार्यांमुळे थंडीचा कडाका पुन्हा एकदा जाणवू लागला आहे. त्यामुळे थंडीच्या वार्याने मुंबईकर सुखावला आहे.