Breaking News

गुणवत्तापूर्वक शिक्षणच समाजाला तारणार ः विधानसभा अध्यक्ष


 चिखली (प्रतिनिधीे) । 04 - शिक्षण हे सर्व समस्यांवरचे रामबाण औषध आहे. समाजाला शैक्षणिक वारसा असणे अत्यंत आवश्यक आहे. असा वारसा असलेला समाज देशाला पुढे नेतो. समाजातील विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी गुणवत्तापूर्वक शिक्षणच समाजाला तारू शकते, असे मत विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज व्यक्त केले.   चिखली येथे तात्यासाहेब महाजन कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती महोत्सव व प.पू बाळासाहेब देवरस यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते, तर प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडेकर, माजी आमदार दत्तात्रय लंके,  गोविंदराव शेटे, दादासाहेब गुरूदासाणी,  रामकृष्ण शेटे, भाऊसाहेब लाहोटी, प्रेमराज भाला, विजय कोठारी, कैलास शेटे आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात नियोजनाला महत्व देण्याचे आवाहन करीत श्री. बागडे म्हणाले, शालेय जीवनात बौद्धीक प्रगती होते. त्यानंतर बौद्धीक प्रगतीस मर्यादा लागतात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा कंटाळा करू नये. केवळ परिश्रम करावे. श्रम माणसाला पुढे नेतात. श्रमाशिवाय यश प्राप्ती होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने परिश्रम करावे, असेही आवाहन त्यांनी केले.  याप्रसंगी आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, एखाद्या संस्थेने सुवर्ण महोत्सव साजरा 
करावा ही त्या संस्थेसाठी भूषणावह बाब आहे. संस्था ही शिक्षण देण्याचे महत्वाचे काम करते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय शिक्षणासोबतच देशभक्तीचे शिक्षणही दिले पाहिजे. कारण विद्यार्थीच पुढे देशाचे नागरिक होत असतात. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून मोठे झाल्यावर आपल्या गावाला विसरू नये. गावाच्या विकासासाठी आपले कौशल्य, शिक्षण उपयोगात आणावी. शिक्षण पूर्ण करून विद्यार्थ्यांनी देशसेवा करावी. देशाला समर्पित आयुष्य जगावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अभय तारे यांनी केले. संचलन प्रा. संतोष गवई यांनी तर आभार प्रा. गव्हांदे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.