भारत - पाकिस्तान परराष्ट्र सचिव स्तरावरील नियोजित बैठक रद्द
नवी दिल्ली, 14 - पठाणकोट हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये शुक्रवारी होणारी नियोजित बैठक तूर्त रद्द करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने
ही बैठक तूर्त रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले.
पठाणकोट हवाईतळावर दहशतवादी हल्ला झाल्यापासून या बैठकीचे भवितव्य अधांतरी होते. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला झाल्याचे भारताने स्पष्ट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही पाकिस्तानवरील दबाव वाढला होता. त्यामुळे पाकिस्तान सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये काही जणांना संशयावरून ताब्यात घेतले. ‘जैश ए मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर यालाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला कोणताही दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते क्वाझी खलिल्लुह म्हणाले, दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र सचिव पातळीवर शुक्रवारी होणारी चर्चा तूर्त रद्द करण्यात आली आहे. या चर्चेसाठी भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर पाकिस्तानला येणार होते. पण ते सध्या पाकिस्तानला येणार नाहीत. ही बैठक पुढे कधी घेण्यात यावी, यावर दोन्ही देशातील नेते चर्चा करीत आहेत. मसूद अझरला अटक करण्यात आल्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे
त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पठाणकोट हल्ल्याप्रकरणी ‘जैश ए मोहम्मद’च्या अनेक सदस्यांना ताब्यात घेण्यात आले असून, विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत, अशी पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
