जकार्तात साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू, 39 जखमी
जकार्ता, 14 - एका नंतर एक अशा सहा स्फोटांनी आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता अक्षरश: हादरली. नुकतेच काही ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समजते आहे. यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोळीबारही सुरु असल्याचे कळते आहे. जवळजवळ 10 ते 14 बंदूकधारी हल्लेखोर गोळीबार करीत असल्याची माहिती आहे.
एक स्फोट शरीना शॉपिंग सेंटरजवळ झाला आहे. हे शॉपिंग सेंटर संयुक्त राष्ट्र कार्यालय आणि राष्ट्रपती भवनाजवळ आहे. संयुक्त राष्ट्र कार्यालयातील एका अधिकार्यांच्या माहितीनुसार अजूनही गोळीबार सुरु आहे.
तर दुसरा स्फोट हा स्टारबक्स कॅफे जवळ झाला. गोळीबार अजूनही सुरु असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. स्फोटात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून हल्ल्यात नेमके कितीजण जखमी झाले आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, अजूनही गोळीबार सुरु असून हल्लेखोर आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरु आहे. इंडोनेशिया टीव्हीच्या वृत्तानुसार, एक पोलीस अधिकारी देखील या गोळीबारात जखमी झाला आहे.
