Breaking News

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा सांगलीत शानदार प्रारंभ


 सांगली, 18 - येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या मैदानावर 61 व्या राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. हातापायाची लवचिकता आणि कुस्तीला पूरक मानल्या जाणार्‍या या स्पर्धेत यजमान महाराष्ट्रासह नऊ राज्यांतून दोनशे खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. 
क्रीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, स्कूल गेम फेडरेशन आणि जिल्हा अ‍ॅमॅच्युअर मल्लखांब असोसिएशनतर्फे आयोजित स्पर्धांचा थरार सुरु आहे.
शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त विभीषण पाटील, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक उदय देशपांडे, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे निरिक्षक रमेश इंदोलिया, उपाध्यक्ष नारायण खुराडे, स्कूल गेम फेडरेशनचे संत शर्मा, महाराष्ट्र असोसिएशनचे गुरुनाथ हिरेमठ, के. जी. जाधव, राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची उपस्थिती होती.
विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी संचलनाव्दारे मानवंदना दिली. भानू तालमी मिरज आणि महाराष्ट्राच्या संघाने 10 खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक दाखवले. दीड मिनिटात जास्तीत जास्त व्यायाम व योगाचे प्रकार दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली. महाराष्ट्र संघातील मुलींनी 16 फूट दोरीवर योग व अ‍ॅक्रोबॅटिक्सचे थरारक प्रात्यक्षिके दाखवली. दोन दिवस चालणार्‍या स्पर्धा विद्युत झोतात होणार आहेत. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, बापू समलेवाले, संस्थेचे शारिरीक शिक्षक जनार्दन झेंडे, सुहास व्हटकर उपस्थित होते.