साहित्याशिवाय जीवनात समृध्दी नाही ः वाघ
सांगली, 18 - साहित्याशिवाय मानवी जीवनात समृध्दी नाही आजच्या युवकांमध्ये असाध्य ते साध्य करण्याची धमक आहे. मात्र, संसारात गुरफटलेल्या आई-वडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, संस्कार करणार्या माणसांची संख्या घटत आहे, अशी खंत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी आज व्यक्त केली. भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम आणि कार्यवाह विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारती हॉस्पिटलचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्य डॉ. डी. डी. जी. कणसे, विश्वास सायनाकर आदी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष विठ्ठल वाघ म्हणाले, साहित्याशिवाय मानवी जीवनात समृद्धी नाही. मनाला विचलित करणारी यंत्रणा वाढत आहे. वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. मनाची एकाग्रताच माणसाला समृद्ध बनवते. वेगळी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी महत्वाचे योगदान देण्याची गरज आहे. संस्कारहीन पिढी देशाला मारक आहे.
विजयमाला कदम म्हणाल्या, शाळा, महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालये आहेत. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करावा. वाचन संस्कृती विकसित केली पाहिजे. आजचे विद्यार्थी पुस्तकांपेक्षा मोबाईलमध्ये जास्त केंद्रित झालेले दिसतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे.
प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतखाली परिसंवाद झाला. संमेलनाचे आयोजन डॉ. भीमराव पाटील, प्रभा पाटील, उज्ज्वला देसाई, एम.एच. पाटील, डॉ. संतोष माने, डॉ. आनंद संकपाळ, श्रीकृष्ण मोहिते यांच्या संयोजन समितीने केले.