पगार विलंबाबद्दल शिक्षणाधिकार्यांकडून नोटीसा
सांगली, 18 - जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांचा डिसेंबरचा पगार विलंबनाबद्दल तासगांव, जत आणि खानापूर तालुक्यांतील गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व संबंधित मुख्याध्यापकांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली. त्या म्हणाल्या, गेल्या महिन्यात तीन तालुक्यांतून वेळेवर माहिती आली नाही. त्यामुळे त्यांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. मिरज तालुक्याचाही पगार विलंबाने झाल्याची तक्रार आहे. त्याबद्दल कर्मचारी अजित वडर यांना नोटीस काढली आहे.दरम्यान मिरज पंचायत समितीतील स्वच्छ भारत अभियानातील कर्मचारी रविंद्र मधाळेला तीन हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेण्यात होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गंत शौचालये बांधण्यासाठीचे अनुदान देण्यासाठी त्याने लाच घेतली होती. झेडपीचे सीईओ दिलीप पाटील यांनी त्याला आज बडतर्फ केले.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे झालेल्या टीईटी परीक्षेस 93 टक्के उमेदवारांनी हजेरी लावली. दोन्ही पेपर चोख बंदोबस्तात पार पाडले. त्यासाठी चार भरारी पथकांचीही नियुक्ती केली होती, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी दिली. सकाळी व दुपारच्या सत्रात परीक्षा झाली. पहिल्या पेपरला 4721 जणांची नोंदणी झाली त्यापैकी 4353 (92.21 टक्के) जण उपस्थित राहिले. मराठी, इंग्रजी व उर्दू भाषेसाठी ही परीक्षा झाली. दुसर्या पेपरसाठी 3798 जणांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 3544 जणांनी (93.31 टक्के) परीक्षा दिली.