Breaking News

चिंचवड देवस्थानचे विश्‍वस्त सुरेंद्रमहाराज यांची आत्महत्या


चिंचवड, 17 - चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त सुरेंद्रमहाराज धरणीधर देव यांनी मंगलमूर्ती वाड्यातील त्यांच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
 सुरेंद्रमहाराज यांचे पार्थिव सोमवारी सकाळी सात ते नऊपर्यंत अंत्यदर्शनासाठी मंगलमूर्तीवाडा येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नऊ वाजता चिंचवड गावातील मोरया मंदिराजवळ असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. सुरेंद्र महाराज देव हे 2001 सालापासून चिंचवड देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त पदावर कार्यरत होते. अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकची मंदिरे देखील या देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली येतात. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे काम लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सुरेंद्रमहाराजांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. या देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या जमिनी ठिकठिकाणी असून त्या जमिनींच्या व्यवहारांबाबतही पोलीस माहिती नुकत्याच झालेल्या मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात मात्र त्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेतला होता. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून ते त्यांच्या खोलीत एकटेच झोपले होते.
सकाळी त्यांचा एक विद्यार्थी सकाळी सहा वाजता पूजेसाठी त्यांना उठवायला गेला होता, मात्र दार वाजवूनही त्यांनी उघडले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यानेच मंगलमूर्तींची पूजा केली. सकाळी नऊ वाजले तरी महाराज बाहेर न आल्याने त्यांचा मुलगा दर्शन याने त्यांच्या खोलीत पाहिले तर त्या ठिकाणी ते नव्हते. वरच्या मजल्यावर त्यांच्या अभ्यासिका व व्यायामाच्या खोलीचे दार बंद असल्याचे लक्षात आले. कडी वाजवूनही दार न उघडल्याने
अखेर दार तोडण्यात आले. त्यावेळी खोलीत गळफासाला लटकलेला महाराजांचा मृतदेह आढळून आला.