जीएसटी विधेयक भाजपामुळेच 7 वर्ष रखडले ः राहुल गांधी
मुंबई/प्रतिनिधी । 17 - जीएसटी विधेयक काँग्रेसनेच प्रथम संसदेत आणले होते आणि भाजपाने त्यावरून गोंधळ घालत ते सात वर्ष अडवून ठेवले होते, नरेंद्र मोदी आणि अरूण जेटलींनी ते पारित होऊ दिले नव्हते अशी घणाघाती टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर असलेल्या राहुल यांनी शनिवारी एनएमआयएमएस कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. काँग्रेसचा जीएसटी विधेयकाला विरोध नाही, भाजपामध्येच जीएसटीच्या मुद्यावर मतभेद आहेत. जीएसटीमुळे नागरिकांवर कराचा अधिक बोजा पडू नये असे आम्हाला वाटते. या विधेयकातील तीन मुद्यावरून आमच्यात व भाजपामध्ये मतभेद आहेत, पण आम्ही सांगितलेले बदल वा दुरूस्ती करण्यास भाजपाचा विरोध आहे, असे राहुल म्हणाले.यावेळी त्यांनी असहिष्णूतेच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणारी स्टार्टअप योजना आणि असहिष्णुता हे दोन्ही मुद्दे एकत्रपणे येऊ शकत नाही, असेही मत त्यांनी मांडले.
वांद्रे ते धारावी राहुल गांधींची पदयात्रा
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सकाळी वांद्रे बँडस्टँड ते धारावी अशी पदयात्रा काढली. या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, नसीम खान आदी प्रमुख नेते सहभागी झाले होते.
