‘शनि’ला महिला आंदोलनाची साडेसाती - । मंदिर परिसरात पोलिस संरक्षण द्या । शनैश्वर देवस्थानची मागणी
अहमदनगर । प्रतिनिधी । 20 - 25 जानेवारीपर्यंत महिलांना दर्शन खुले करावे अन्यथा 26 जानेवारी रोजी 400 महिला चौथार्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतील असा इशारा पुणे येथील भूमाता रणरागिनी संघटनेने इशारा दिला आहे. भूमाता संघटनेच्या महिलांना रोखण्यासाठी मुख्य मंदिर परिसरात पोलीस संरक्षण देण्याची मागणी देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली.
पुणे येथील महिला संघटनेने प्रजासत्ताक दिनी चौथर्यावर जावून शनिदेवाचे दर्शन घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांना विरोध करण्यासाठी शनी चौथर्याभोवती मानवी कडे करणार असल्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानच्या अध्यक्षा शेटे यांच्या नेतृत्वाखाली विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कवडे यांची भेट घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यावेळी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान प्रजासत्ताक दिनी शिंगणापूर येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य मंदिर परिसरात पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे येथील सुमारे 400 महिला चौथर्यावर जावून दर्शन घेणार आहेत, तसे संघटनेने जाहीर केले आहे. चौथर्यावर जाण्यास बंदी असताना महिलांनी चौथर्यावर जावून दर्शन घेणे धार्मिक परंपरेला विरोध करणारे आहे. त्यास विरोध करण्यासाठी गावातील महिलाही एकत्र येत असून, प्रजासत्ताक दिनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या परिसरात पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
भुमाता ब्रिगेडच्या या निर्धाराने हिंदू धर्मातील अनेक संघटनांमध्ये असंतोष पेटला आहे. भुमाता ब्रिगेडला रोखण्यात यावे यासाठी जिल्ह्यातील हिंदू जनजागृती समिती, अखिल भारतीय छावा संघटना व इतर विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत विरोध केला आहे. भुमाता ब्रिगेडच्या महिला दुपारी 12.30 वा.चौथार्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतील असा इशारा यावेळी प्रशासनाला दिला आहे.