Breaking News

शिंगणापूरचे मागासलेपण!

भारताच्या प्रजासत्ताक दिनीच शनि शिंगणापूर मंदीर प्रवेशासाठी महिलांनी आंदोलन केले तेव्हा भारतीय समाजात याची चर्चा ओघाने होणारच. भूमाता ब्रिगेडच्या वतीने केले गेलेले आंदोलन हे सर्वत्र चर्चेचा विषय झाला नाही तर नवल वाटेल अशीच ही अवस्था होती. महिला सक्षमीकरण असो अथवा स्त्री स्वातंत्र्य या प्रश्‍नावर समाजाला आधुनिक व्हावेच लागेल. भारतीय समाजात जे मध्ययुगीन संस्कार दिसून येतात त्यावर जगाची नजर आहे. पण आपल्या देशाकडे जगाची नजर आहे म्हणून आपण बदल करावेत असे खरोखर आहे काय? तसे म्हटल्यास भारतातील प्राचीन तत्वज्ञान आणि संस्कृती आजही पाश्‍चिमात्यांना पूजनीय आहे. भारताला विदेशी चलन जे मिळते त्यात पर्यटनातून मिळणार्‍या विदेशी चलनाचा वाटा मोठा आहे. त्यामुळेच केंद्र सरकार व विविध राज्य सरकारे यावर विशेष लक्ष देत आहेत. या पर्यटनात सर्वाधिक वाटा आहे तो बौध्दस्थळ पर्यटनाचा. त्यामुळेच पाच स्थळांना जोडणारे बुध्दिस्ट सर्किट जोडले गेले. याचाच अर्थ या स्थळांना भेट देणारे समतेचा आणि विज्ञानवादी विचार यांचा प्रशंसकच नाही तर स्विकार करणारा आहे. पण आमच्या भारतात असणारा संघर्ष हा ब्राह्मणी विचार विरूध्द बहुजन विचार असा आहे. या सनातनी ब्राह्मणी विचार हा मागासलेला विचार आहे. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलितील ब्राह्मण तरूणांना ते अडचणीचे होत आहे. मात्र हा मागासलेला विचार किंवा संस्कृती बहुजन भारतीयंवर अज्ञानातून लादणारे ब्राह्मण जागतिक पातळीवर या मागास विचारांमागे आपण नसल्याचे भासविण्यासाठी त्यांनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेशाचे आंदोलन करण्यासाठी तयारी केली. यातून त्यांनी काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे आमच्या सत्ताकाळात आम्ही हे प्रश्‍न सोडवू इच्छित असल्याचे जगाला भासवणे, दुसरे म्हणजे संविधानाची पूर्ण अंमलबजावणी आमच्या मर्जीवर असल्याची दर्पोक्ती त्यांना करावयाची आहे. शिवाय मागासलेल्या विचारांची संस्कृती स्वीकारणारे बहुजनच संविधानाच्या अंमलबजावणीत अडथळा आहेत हे त्यांना बिंबवायचे आहे. त्यामुळेच याविषयावर प्रजासत्ताक दिनी शनी मंदीर प्रवेशावरील चर्चेसाठी खाजगी वाहिन्यांवर जी चर्चा घडविण्यात आली त्यात ब्राह्मण महिला पुरोगामी भूमिका घेवून चर्चा करित होत्या तर सनातन विचारांचे प्रतिनिधीत्व बहुजन महिला करित होत्या. माध्यमांना या प्रश्‍नावर चर्चाच घडवायची होती तर त्यांनी बहुजन समाजातील क्रांतिकारी वा पुरोगामी विचारांच्या महिलांना का पाचारण केले नाही? याचाच अर्थ प्रसार माध्यमात पुरोगामी म्हणून वावर असणारे माध्यमी हे देखील ब्राह्मणी विचारांच्या इशार्‍यावर पत्रकारिता करित आहेत, हे स्पष्ट होते.