स्वामी विवेकानंदाची विचार ऊर्जा देणारे ः क्रीडाअधिकारी रासणे
अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - स्वामी विवेकानंदाचे विचार युवा वर्गाला ऊर्जा देणारे आहे. युवा वर्गाने स्वामी विवेकानंदाचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. युवा ही राष्ट्राची शक्ती आहे. कोणतीही कृती करण्याची युवांची तयारी असते परंतू विधायक कार्याकडे युवकांना वळवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी नंदकिशोर रासने यांनी केले.
स्वामी विवेकानंद व जिजामाता जयंती निमित्त नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रिडा कार्यालयाच्या वतीने आयोजित युवा मेळाव्याप्रसंगी क्रीडाधिकारी रासने बोलत होते. यावेळी नेहरु युवा केंद्राचे हरिष ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, जय युवा अॅकेडमीचे अध्यक्ष अॅड.महेश शिंदे, प्रसाद भडके, सलिम सय्यद, गौतम सातपुते, राजेश जाधव, संजय भिंगारदिवे, रमेश गाडगे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी, रयतेच्या राज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारे आई जिजाऊ व युवकांना अन्यायाविरुध्द लढण्याची, दुर्गुणांपासून दूर राहण्याची प्रेरणा देणारे तरुणांचे श्रध्दास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांची जयंती एकत्रितरित्या साजरी होणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे दत्ता जाधव म्हणाले.
अॅड.महेश शिंदे यांनी समाजात वाढत चाललेली गुन्हेगारी, अत्याचार, लुटमार थांबवण्यासाठी युवावर्गाने संघटित होऊन या अपप्रवृत्तीचा प्रतिकार करण्याचे व युवकांनी समाजहिताच्या कार्यात रस दाखवून समाजातिल वंचित घटकांसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. युवकांसाठी चालू असलेल्या नेहरु युवा केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी नंदकिशोर रासने यांच्या हस्ते शिवक्रांती तरुण मंडळ, सक्षम मेडिकल, लाईफलाईन फाऊंडेशन, जय युवा अॅकेडमी, समता विकास प्रतिष्ठान आदी युवा मंडळाच्या सदस्यांना क्रिडा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र कुलकर्णी यांनी केले. उपस्थितांचे आभार सना तांबोली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना देवकर, चंद्रकांत दिकोंडा, बाळासाहेब पाटोळे, नरेश बिरा, सनिल बुरा, सोनू गुंडू, उजमा शेख, रमेश गाडगे आदींनी परिश्रम घेतले.