अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन
अतिक्रमणास पाठिंबा देणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करा ः ग्रामस्वराज्य न्यायाग्रह
अहमदनगर । प्रतिनिधी । 14 - तालुक्यातील पळशी येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्याच्या संकल्पित जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याचा आदेश असतानाही सदर अतिक्रमण न हटवता बेकायदेशीर अतिक्रमणास पाठिंबा देणार्या शासकिय अधिकार्याच्या निषेधार्थ मंगळवार दि.12 जानेवारी रोजी पळशीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ग्रामस्वराज्य न्यायाग्रह आंदोलन केले.
1952 साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीला 63 वर्षापासून स्वमालकिची इमारत नाही. शाळेच्या जागेत ग्रामपंचायत भरवली जात असताना गावकर्यांच्या विकासात्मक कार्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाची गरज भासत आहे. ग्रामपंचायतच्या जागेवर जनसुविधा योजने अंतगर्त 10 लाख रु. ग्रामपंचायतची प्रशासकिय इमारतीसाठी अनुदान मिळाले आहे. मात्र इमारतीच्या प्रस्तावित जागेत एका महिलेने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने सदर काम रखडले आहे. शासनाकडून मिळालेल्या निधीचे 31 मार्च 2016 अखेर पयरत खर्च होणे अपेक्षित असल्याने निधी देखील परत जाण्याच्या मार्गावर असल्याची प्रतिक्रीया सरपंच संतोष जाधव यांनी व्ये केली. इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतने अनाधिकृत अतिक्रमण काढण्याचे 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव केला होता. दोन ग्रामस्थांनी स्वत:हून सदर जागेतील अतिक्रमण काढले. या जागेत बेकायदेशीर पेट्रोल विक्री करणार्या छाया साखंदे या महिलेचे अतिक्रमण आहे. सदर अतिक्रमण काढण्यासाठी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आदेश देऊन, पोलिस अधिक्षकांना पत्र दिले होते. 4 जानेवारी 2016 रोजी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढले जात असताना विस्तार अधिकारी संजय नन्नवरे यांनी बेकायदेशीरपणे कारवाईत हस्तक्षेप करुन जिल्हाधिकारी यांची परवानगी शिवाय सदर अतिक्रमण काढू दिले जाणार नसल्याचे सांगून, सदर अतिक्रमणास पाठिंबा दिली. मिळकत नं.281 वरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यातील अडथळा दूर करुन सदर अतिक्रमण त्वरीत हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी भोर यांना देण्यात आले. या आंदोलनात सरपंच संतोष जाधव, ग्रा.पं. सदस्य इंदूताई मेंगाळ, कमल गांगड, कुसुमबाई मधे, अॅड.कारभारी गवळी, दिल्लीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभू नारायण, अशोक सब्बन, जयश्री जाधव, शंकर साळवे, तुकाराम बिलबिले, जर्हाड मेजर, भास्कर जाधव, शिवाजी सुळ, शिवाजी शिंदे, विष्णू मधे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.