यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारची विशेष शिष्यवृत्ती योजना
मुंबई/प्रतिनिधी । 13 - यूपीएससीची तयारी करणार्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली असून, याअंतर्गत विद्यार्थी युपीएससीच्या मुख्य परीक्षेत नापास झाला, तरीही त्याचा पुढील वर्षीच्या मुख्य परीक्षेपर्यंतचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
राज्य सरकार संबधित विद्यार्थ्याचा शैक्षणिक तसेच निवासाचा खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी फडणवीस सरकारने हे पाऊल उचलले आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणार्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ताही मिळणार आहे. या योजनेनुसार राज्यातील होतकरू आणि गुणवंत उमेदवारांना यूपीएससी परीक्षांची पूर्व तयारी करून घेणार्या दिल्ली येथील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य तसेच दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षणाच्या वास्तव्याच्या कालावधीत प्रतिमहिना दहा हजार रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, या योजनेसाठी 23 कोटी 46 लाख इतक्या खर्चास
मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा रहिवासी आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असणार्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.