Breaking News

मुंबईतील 15 ठिकाणे नो सेल्फी झोन


 मुंबई/प्रतिनिधी । 13 - मुंबईतील 15 ठिकाणे नो सेल्फी झोन म्हणून मुंबई पोलिसांकडून घोषित करण्यात आली आहेत. सेल्फी काढणे धोकादायक असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सेल्फी काढताना वांद्रे बँडस्टँडवर समुद्रात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, सायन फोर्ट, वरळी फोर्ट यांच्यासह मुंबईतील अन्य लोकप्रिय ठिकाणांचा नो सेल्फी झोनच्या या यादीत समावेश असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांकडून अशा ठिकाणी सेल्फी काढताना होणारे अपघात टाळण्यासाठी पालिकेच्या स्थानिक प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. 
पालिकेकडून अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्याची आणि धोक्याचे फलक लावण्याची शक्यताही धनंजय कुलकर्णी यांनी वर्तविली. शनिवारी सकाळी वांद्रे येथील बँडस्टँड येथे फिरायला गेलेल्या तीन मैत्रिणी वांद्रे किल्ल्याच्या तटबंदीवर सेल्फी काढण्यासाठी उभ्या असताना त्यांचा तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवायला पाण्यात उडी मारणार्‍या एका बहाद्दराने दोघींना वाचवले खरे, मात्र तिसरीला वाचवण्याच्या प्रयत्नात तोही बुडाला. गेल्याच महिन्यात नाशिकमध्ये सेल्फी काढताना तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता.