Breaking News

मंत्री गिरीश बापट यांचा सरकारी जपान दौरा वादात, मुलगा सोबत नेल्याने चर्चेत


मुंबई , 22 - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे सरकारी खर्चाने आठवडाभरासाठी विदेशवारीवर गेले आहेत. मात्र ते आपला मुलगा आणि जनसंपर्क व्यवस्थापकाला सोबत घेऊन गेल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. 
मंत्री अशा पद्धतीने विदेशवार्‍या करू शकतात का आणि करणे योग्य आहे का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने बापट हे मोठा लवाजमा सोबत घेऊन जपानला गेले आहेत. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने (जायका) पुण्टातील नदी सुधारणा प्रकल्पाला एक हजार कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. तसेच पुण्यातील पाणी पुरवठा व अन्य योजनांनाही अर्थसहाय्य देण्याची दर्शवली आहे. यासंदर्भात जपानमधील संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी आणि काही करारांवर स्वाक्षर्‍या करण्यासाठी बापट हे गेल्याचे सांगण्यात आले. मात्र या शासकीय दौर्‍यात ते आपला मुलगा गौरव बापट आणि जनसंपर्क व्यवस्थापक सुनील माने यांनाही सोबत घेऊन गेले आहेत.त्यामुळे बापटांचा हा दौरा वादग्रस्त ठरला आहे. बापट यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्याने आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी घरातील कुणी तरी सोबत असावे, म्हणून ते मुलाला घेऊन गेल्याचे त्यांच्या निकटस्थांनी सांगितले. मात्र गौरव आणि माने यांनी या प्रवासात विमान भाडे, हॉटेल भाडे, स्थानिक प्रवासाचा खर्च स्वत:च्या खिशातून केल्याचा कोणता पुरावा बापट सादर करणार? आणि सादर केलेला पुरावा विश्‍वासार्ह कसा मानायचा? असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
गौरव बापट हे स्वखर्चाने या दौर्‍यात गेले आहेत. त्यांच्या दौर्‍यासाठी कोणताही शासकीय खर्च केला जाणार नाही,असा दावा बापट यांचे मंत्रालयातील स्वीय सचिव चिंतामण जोशी यांनी केला. मात्र बापट नेमके एक आठवडा कोणत्या शहरांना भेटी देणार, कुणाशी चर्चा करणार याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.