Breaking News

शि. द. पाटील यांनी पोत्यांनी पैसे मिळविले ः दिलीपतात्या

सांगली ः दि. 25 -  शि. द. पाटील यांनी माझे वडील लालासाहेब पाटील यांच्याशी दगाबाजी करूनच शिक्षक संघाचे अध्यक्षपद भूषविले. ज्यांनी त्यांना अध्यक्ष केले, त्यांनाही पुढे दगा देऊन राष्ट्रीय अध्यक्षपद बळकावले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी अधिवेशने घेऊन पोत्याने पैसे पळविले असून, याचा कधीच हिशेब दिला नाही. त्यांना संभाजीराव थोरातांनी पैशाचा हिशेब मागितला आणि संघाचे राज्यात तुकडे झाले, अशी टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी शनिवारी येथे केली.
शिक्षक संघातर्फे  संघटनेचे नेते संभाजीराव थोरात, एस. डी. पाटील आणि आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार पाटील यांच्याहस्ते करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की, माझे वडील शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना राज्याध्यक्षपदी निवडण्याचे आदल्यादिवशी ठरले होते, पण रात्रीत काहींनी सूत्रे फिरविली आणि सकाळी सांगलीत झालेल्या अधिवेशनामध्ये शि. द. पाटील यांना राज्याध्यक्ष करण्याचा निर्णय झाला. पुढे शि. द. पाटील यांनी अधिवेशने घेऊन केवळ पैसे गोळा करण्याचाच उद्योग केला. कुठल्याही अधिवेशनाच्या पैशाचा हिशेब दिला नसल्याच्या तक्रारी आहेत. शि. द. पाटील आणि संभाजीराव थोरात यांच्यातील फुटसुध्दा अधिवेशनाच्या पैशातूनच झाली आहे. चुकीच्या माणसाच्या हातात कारभार दिल्यामुळे किती नुकसान होते, याचा शिक्षकांनी अनुभव घेतला आहे. शि. द. पाटील यांच्या संघटनेत ते स्वत:च राहतील, कोणीही शिक्षक तिकडे फिरकणार नाही. थोरात यांनी दोन संघटना म्हणून कारभार करू नये. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. थोरात म्हणाले की, 6 फेब्रुवारीला नवी मुंबई येथे शिक्षक संघाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे.यावेळी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष एस. डी. पाटील, पुणे विभागीय अध्यक्ष तानाजीराव खोत, हंबीरराव पवार, सतीश पाटील, अरुण 
पाटील, शोभाताई शिंदे आदींची भाषणे झाली. संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक बँकेचे संचालक अविनाश गुरव यांनी स्वागत केले. यावेळी शशिकांत माणगावे, संजीवनी जाधव, नागम्मा बेळुंखी, जीवन सावंत आदी उपस्थित होते.