लोकसहभागातून केलेले दर्जेदार काम राज्यासाठी आदर्शवत ः प्रा. राम शिंदे
तासगांव ः दि. 25 - तासगाव नगरपरिषदेने वॉर्ड क्र. 1 च्या पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाचा कोणताही निधी न घेता केवळ लोकसहभागाच्या माध्यामातून पूर्ण केलेले दर्जेदार काम राज्यासाठी एक आदर्श असल्याचे गौरवोद्गार गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषि व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज येथे काढले.
तासगाव नगरपरिषदेच्यावतीने तासगाव शहर पुणदी रोड, पाणी टाकी झोन वॉर्ड क्र. 1 मधील 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार संजयकाका पाटील, नगराध्यक्ष बाबासो पाटील उपनगराध्यक्षा सारिकाताई कांबळे, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपिचंद पडळकर, आदी मान्यवर उपस्थित होते. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, तासगाव नगरपरिषेदच्या वॉर्ड क्रमांक एक मधील रहिवासी असलेल्या सुमारे 1 हजार कुटुंबांनी प्रत्येकी 5 हजार 850 इतका निधी देवून नगरपरिषेदेच्या माध्यमातून स्वत:च्या पिण्याच्या व इतर वापराच्या पाण्याची 24 बाय 7 सोय करुन घेतली आहे. अशा प्रकारे वर्गणी देणारी ही जनता अभिनंदानसाठी पात्र आहे असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, जनतेचे प्रशासनास अशा प्रकारे सहकार्य लाभले तर
इतर सुविधाही अधिक जास्त गतीने पुरविणे प्रशासनाला सोपे होईल. राज्य शासन सत्तेवर आल्यापासून तासगाव नगरपरिषेदला आतापर्यत 3 कोटी 60 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातुन तासगाव नगरपरिषदेची विकासाची कामे गतीने सुरु आहेत. पुढील काळातही राज्य शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही शेवटी त्यांनी दिली. खासदार संजयकाका पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तासगाव नगरपरिषद विकास कामे करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीली असून या क्षेत्रामध्ये वास्तव्य करणार्या सर्वच नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यावर या नगरपरिषदेचा भर असतो. आगामी काळात नगरपरिषदेच्या सर्वागिन विकासाठी राज्य शासनासबरोबरच केंद्र शासनाच्या निधीमधूनही निधी देण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे ते शेवटी म्हणाले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपिचंद पडळकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास तहसिलदार सुधाकर भोसले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, गट विकास अधिकारी एस.व्ही. गाडवे, नगरपरिषदेचे नगरसेवक, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येंनेे उपस्थित होते.