टोळीवाल्यांच्या हातात राजसत्ता
मुंबई, प्रतिनिधी, दि. 8 - इंदिरा गांधी यांनी चुकीच्या पद्धतीने आणीबाणी लादली. आताची आणीबाणी टोळीवाल्यांनी लादली आहे. खरे लिहिणार्यांच्या डोक्यात गोळ्या घालून ते निघून जात आहेत.
आरोपी सरकारला सापडत नाहीत. आता टोळीवाल्यांच्या हातात राजसत्ता आणि धर्मसत्ता आहे. हेच पत्रकारितेसमोरचे खरे आव्हान आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी काल व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवनात विविध पुरस्कार देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार ह. मो. मराठे यांना विद्याधर गोखले पुरस्कार, प्रहारचे विनोद साळवी यांना कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार, पुढारीचे राजेश सावंत यांना आप्पा पेंडसे पुरस्काराने द्वादशीवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. द्वादशीवार म्हणाले की, पत्रकारितेत ज्ञानवंतांची पिढी होती. गांधी, आंबेडकर, टिळक, आगरकर यांच्या पत्रकारितेविषयी आज फारसे कुणी बोलत नाही. ते महान संपादक होते. त्यांची वृत्तपत्रे ही संदेशपत्रे होती. समाजावर त्यांचा प्रभाव होता. आता वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला आहे. व्यवसायासाठी आवश्यक सगळ्याच बर्यावाईट गोष्टी या व्यवहारात आल्या आहेत.