सहकाराच्या संस्कारित भावनेने कारखाना चालवावा
नाशिक/प्रतिनिधी। 20 - सहकारी साखर कारखाना सुरु राहणे ही काळाची गरज असून सहकाराच्या संस्कारित भावनेने कारखाना चालवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, डॉ.सुभाष भामरे, आमदार डॉ.राहुल आहेर, सीमा हिरे,अनिल कदम,अपूर्व हिरे, जे.पी.गवित,जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, जि.प.सभापती केदा आहेर आदी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, सहकार क्षेत्र उध्वस्त झाले तर खाजगी क्षेत्राची मक्तेदारी निर्माण होईल त्यात शेतकर्यांचे नुकसान होईल. सहकार आणि खाजगी क्षेत्र एकाच वेळी क्षमतेने सुरु राहिल्यास निकोप स्पर्धा निर्माण होऊन गुणवत्ता वाढेल, नव्या तंत्राचा वापर होऊ शकेल आणि त्यामुळे शेतकर्यांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
संचालक मंडळ, कर्मचारी आणि शेतकरी हे साखर कारखान्याच्या तीन महत्वाचे घटक असल्याचे सांगुन ते म्हणाले, संचालक मंडळाने कारखाना सुरु झाल्यानंतर तो चांगल्या प्रकारे चालविणे तेवढेच महत्वाचे आहे. सहकाराच्या भावनेने आणि शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना चालविला जाणे गरजेचे आहे. कर्मचार्यांनी देखील कारखान्यामुळे आपले अस्तित्व आहे हे लक्षात घ्यावे. पुढील तीन वर्ष संक्रमणाची असून कुटुंबाची समस्या दूर करण्याच्या भावनेने आणि प्रेरणेने काम करावे. साखर कारखान्यामुळे ऊसाला चांगला भाव मिळतो हे लक्षात घेवून शेतकर्यांनी देखील कारखान्याला सहकार्य करावे. या तीन घटकांनी एकत्र कार्य केल्यास वसाका देशासमोर आदर्श उदाहरण प्रस्तूत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील वर्षी सहकारी क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांना दोन हजार कोटींची मदत शासनाने दिली. यावर्षी सुदैवाने साखरेला चांगला भाव आहे. त्यामुळे कारखान्याने सकारात्मक दिशेने वाटचाल सुरु ठेवल्यास त्याचा लाभ सभासद आणि शेतकर्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, गैरव्यवहारामुळे राज्यातील अनेक प्रकल्पांच्या निर्मितीत अडचणी आहेत. जलसंपदामंत्र्यांनी गेल्या वर्षभरात चांगले प्रयत्न करून अनेक प्रस्तावांना मान्यता दिली. येत्या वर्षात सिंचनासंदर्भात मोठ्या प्रमाणात कामे होतील आणि नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री महाजन म्हणाले, शेतीत चांगले उत्पादन पाण्याशिवाय शक्य नाही. मात्र पावसाचे प्रमाण मर्यादीत असल्याने पाण्याच्या नियोजनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक सुक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग केल्यास पाण्याच्या बचतीसोबत पिकांची गुणवत्तादेखील वाढते. पाण्याच्या प्रत्येक थेबांचा उपयोग करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पाण्याचा काटसरीने वापर करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यासंदर्भात इस्त्राईल सारख्या लहान देशाचा आदर्श समोर ठेवण्यासारखा आहे, असे त्यांनी सांगितले. कसमोद पट्यासह जिल्ह्यातील प्रकल्पांची काम थांबू दिले जाणार नाही, अशी ग्वाही श्री.महाजन यांनी दिली.
श्री. भुसे म्हणाले, सहकार क्षेत्रातून भ्रष्टाचार दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अडीच लाख संस्थापैकी उद्दीष्टाप्रमाणे काम करणार्या आणि शेतकर्यांच्या हित जपणार्या संस्था फार कमी आहे. केवळ नावापुरता सुरु असलेल्या आणि सभासदांच्या हिताची काळजी न घेणार्या संस्था बंद करण्याबाबत मोहिम हाती घेण्यात आली आहे. शेतकर्यांच्या हितासाठी सहकारी संस्था चांगल्यारितीने चालणे गरजेचे आहे. साखर कारखाना सुरु झाल्यामुळे त्याचा फायदा शेतकर्यांना होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खा. चव्हाण आणि केदा आहेर यांनीही आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रास्ताविकात डॉ.आहेर यांनी प्रतिकुल परिस्थितीत कर्मचारी, अधिकारी,शेतकर्यांच्या सहकार्याने कारखाना सुरु होत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते कार्यकारी संचालक बी.डी.देवरे, तांत्रिक सल्लागार एस.डी.चव्हाण, विशाल मोरे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.