दिल्ली सरकार ‘शिका व कमवा’ योजना राबविणार
पुणे (प्रतिनिधी) । 20 - महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘शिका व कमवा’ योजनेला उद्योग, व्यवसाय तसेच समाजातर्फे मिळालेल्या अभूतपूर्व यशाने देशातील विविध राज्यसरकार त्यांच्या राज्यामध्ये अशाप्रकारची योजना ‘यशस्वी’ संस्थेच्या माध्यामातून राबविण्यास उत्सुक आहेत, त्यानुसार चर्चाही सुरु आहे. दिल्ली सरकारने यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असून ‘यशस्वी’ संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे.
‘यशस्वी ग्रुप’च्या वतीने अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी व दिल्ली प्रशासनाच्या वतीने दिल्ली प्रशिक्षण व तंत्रशिक्षण संचलनालयाचे संचालक मनोज कुमार यांनी या करारावर स्वाक्षरी केली. तसेच प्रशिक्षण व तंत्रशिक्षण संचलनालयाच्या शैक्षणिक विभागाच्या उपसंचालिका सुमन धवन यांनी या करारासाठी विशेष सहकार्य केले.
या कराराच्या अंतर्गत दिल्लीमधील बेरोजगार तरुणांना उद्योगधंद्यांमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग स्वरूपाचे प्रशिक्षण आणि दिल्ली तंत्रशिक्षण विभागातर्फे पदविका देण्यात येणार असून शिक्षणाचा सर्व खर्च तसेच विद्यार्थ्यांना दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. याआधी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी (छडऊ-) ने या ‘शिका व कमवा’ योजनेला भारतातील सर्वोत्तम कौशल्य विकास कार्यक्रम म्हणून ‘यशस्वी’ संस्थेचा गौरव केला आहे.