Breaking News

कोथरूड येथे व्यायामशाळा मालकावर गोळीबार

 पुणे (प्रतिनिधी) । 20 -  कोथरुडमधील सिटी प्राईड सिनेमागृहाजवळ असलेल्या गोल्ड्स जिमच्या मालकावर बिगबझार मॉलच्या पार्किंगमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. मोटारसायकलवर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्या मोटारीसमोर येऊन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. 
शकील विजापुरे असे हल्ला झालेल्या जीम मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापुरे यांच्या मालकीची गोल्ड्स जिम सिटी प्राईड सिनेमागृहाजवळ आहे. सोमवारी रात्री जिममधून निघाल्यानंतर ते बिगबझारच्या पार्किंगमध्ये गेले. त्यांच्या मोटारीमध्ये ते ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. पार्किंगमध्ये मोटारसायकलवर आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्या मोटारीच्या पुढील काचेवर एक गोळी झाडली. तर दुसरी गोळी ते ज्याठिकाणी बसले त्या बाजुच्या काचेवर झाडली. त्यानंतर आरोपी पसार झाला. सुदैवाने या हल्ल्यात विजापुरे जखमी झालेले नाहीत. ऐन गर्दीच्या वेळेला झालेल्या या गोळीबारामुळे कोथरुडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे महिलेचे कारण असून त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अली याला तपासाकरीता ताब्यात घेतले आहे.