Breaking News

मुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर


 मुंबई, 14 -  मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ पोलीस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले असून आज,  गुरुवारी ते राज्य सरकारच्या सेवेत दाखल होत आहेत. विद्यमान आयुक्त जावेद अहमद सेवानिवृत्त होताच पडसलगीकर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतील, 
अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 
विद्यमान पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नियमानुसार पोलीस आयुक्तपदाचा त्यांचा कार्यकाल 31 जानेवारी रोजी संपत आहे. मात्र त्यापूर्वीच अहमद राजीमाना देऊन राजदूत म्हणून जाण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच पडसलगीकर यांना आयुक्तपदी नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रतिनियुक्तीवर असलेल्या पडसलगीकर यांना राज्याच्या सेवेत परत पाठविण्याची विनंती केंद्राला करण्यात आली होती. त्यानुसार केंद्र सरकारने त्यांना मुक्त केले आहे.  पोलीस आयुक्त म्हणून पडसलगीकर यांना आॅगस्ट 2018 पर्यंत काम करण्याची संधी मिळू शकते. भारतीय पोलीस सेवेच्या 1982 च्या तुकडीतील अधिकारी असलेले पडसलगीकर हे गेल्या काही वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते.
राज्यसेवेत परत येण्यापूर्वी ते केंद्रीय गुप्तवार्ता (आयबी) विभागात अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वीही त्यांनी देश आणि परदेशात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. मुंबई पोलीस दलातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत. परिमंडळ दोनचे उपायुक्त म्हणून पडसलगीकर यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता.