Breaking News

‘माझा पहिला ऑटोग्राफ पुण्यातच’ ः धर्मेंद्र


पुणे (प्रतिनिधी), 14 - पुण्यातील लोक माझे आहेत. आज मी अनेक वर्षांनी पुण्यात आलो आहे. फार पूर्वी मी गाडी चालवत पुण्यात यायचो. प्रभात स्टुडिओमध्ये पूर्वी शूटिंगसाठी येणे व्हायचे आणि याच स्टुडिओमध्ये मी माझा पहिला ऑटोग्राफ दिला होता. अशी भावना ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी विवेक सुतार आणि नंदू खणसे आयोजित जितेंद्र भुरूक प्रस्तुत ‘पल पल दिलके पास.’ या कार्यक्रमात व्यक्त केली. 
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनानिमित्त ‘पल पल दिल के पास’ हा खास कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गेल्या 50 वर्षातील धर्मेंद्र यांच्या रुपेरी आयुष्यातील अनेक घटनांना उजाळा देत रसिकांनी आणि कलाकारांनी धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीला टाळ्यांच्या प्रचंड कडकडात देत सलाम केला. त्यावेळी धर्मेंद्र पुणेकर रसिक प्रेक्षकांशी दिलखुलासपणे गप्पा मारीत होते. माझा पहिला आॅटोग्राफ पुण्यातच त्यामुळे पुण्यावर माझे विशेष प्रेम असल्याचेही ते म्हणाले.
पुण्यात प्रभात स्टुडिओमध्ये शुटिंगला यायचो तेव्हा शुटींग झाल्यावर महाबळेश्‍वरला जायचो. त्यावेळी पुणे फार लहान होते. प्रवास करताना बरीच शेती लागायची पण आता पुणे फारच वाढले आहे. पण पुणेकर रसिक मात्र तसेच भरभरून प्रतिसाद देणारे आहेत. अशा अनेक आठवणींना उजाळा देत धर्मेंद्र पुणेकर रसिक प्रेक्षकांशी संवाद साधत होते.  जितेंद्र भुरूक, धवल चांदवडकर, प्रशांत नासेरी, अली हुसेन, अर्चना सुतार, रेश्मा मुखर्जी यांनी धर्मेंद्र यांच्या सदाबहार गाण्यांवर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.तर संदीप पाटील यांच्या खुमाकदार शैलीने धर्मेंद्र यांच्याशी संवाद साधला.  ‘मेरा दिल मचल गया तो’ , आज मौसम बडा बेईमान है’, ‘पल पल दिल के पास’, ‘कोई हसीना जब रूठ जाती ही तो’ अशी एकापेक्षा एक सुरेल गाणी आणि त्याच्या जोडीला धर्मेंद्र यांनी या गीतांमागील घडामोडींबरोबरच आपला चित्रपटसृष्टीतील आपला प्रवास उलगडला.