Breaking News

तापी महाकाय पुनर्भरण योजना देशातील ग्रीन योजना-मुख्यमंत्री


 जळगाव/प्रतिनिधी। 12 - तापी नदीचे अतिरिक्त पाणि अडवून ते जमिनीत जिरवून मोठ्या क्षेत्राची भुजल पातळी वाढविणारी  तापई मेगा रिचार्ज योजना ही देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक (ग्रीन) योजना आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. तापी महाकाय पुनर्भरण योजने संदर्भात  आज जळगाव येथे सादरीकरण करण्यात आले. त्याप्रसंगी ना. फडणवीस बोलत होते. यावेळी उपस्थित केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी एकत्र काम करु, असे आवाहन करुन सिंचन क्षेत्रात क्रांती आणण्याचे सुतोवाच केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री ना. 
गिरीष महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रयागताई कोळी, जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ए. टी. नाना पाटील, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, मध्यप्रदेश बर्‍हाणपूर येथील आमदार अर्चना चिटणीस, आमदार सर्वश्री हरिभाऊ जावळे, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी,  उन्मेष पाटील, किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, विधानपरिषदेच्या आ. स्मिताताई वाघ, आ. गुरुमुख जगवाणी, केंदीय जलसंपदा मंत्रालयाचे सचिव अमरजितसिंग,  राज्याचे जलसंपदा विभागाचे सचिव श्री. उपासे,  राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान रुडकीचे निर्देशक आर. डी. सिंग, डॉ. दीपांकर साहा, नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले,  जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय,  पोलीस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर  तसेच मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलतांना ना. फडणवीस म्हणाले की, तापी मेगा रिचार्ज प्रकल्प हा जगातील वेगळा प्रकल्प ठरेल, सगळ्यात मोठ्या क्षेत्राचे जलपुनर्भरण करणारा हा प्रकल्प आहे.  उत्तर महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फायदा होईल.  सातत्याने भूगर्भातून  होत असलेला पाणी उपशामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. हे वेळीच थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे ही योजना खूप फायदेशीर ठरेल. या योजनेसंदर्भात संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतांना ते म्हणाले की,  योजनेचे दोन टप्पे एकत्र करुन  प्रकल्पाची किँमत 9 हजार कोटींवरुन 4 हजार कोटींपर्यंत खाली आली आहे. ही योजना कार्यान्वित करुन तापी काठच्या परिसराचा कायाकल्प होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
सिंचन प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी एकत्र काम करु- ना. उमा भारती
 यावेळी  बोलतांना ना. उमा भारती म्हणाल्या की,  जनप्रतिनिधींशी संवाद साधुन शास्त्रज्ञांनी ही योजना तयार 
केली आहे.  ही योजना म्हणजे चमत्कार ठरेल.  महाराष्ट्रात चार लाख हेक्टर व मध्यप्रदेशात 1 लाख हेक्टर 
क्षेत्राला याचा फायदा होऊन दोन्ही राज्यातील मिळून 25 लाख लोकांना रोजगाराची सोय यामुळे होणार आहे.  
हे होत असतांना 5 मिटरपर्यंत पाणी पातळीही वाढणार आहे. राज्यातील आणि देशातील सिंचन व्यवस्था सुरु 
करतांना आधी अपूर्ण प्रकल्पांना पूर्ण करुन त्यांचे लाभक्षेत्र सिंचनाखाली कसे येईल हे पाहिले पाहिजे. हे धोरण राबविल्याने मध्यप्रदेशात कृषिविकासाचा दर सर्वाधिक वाढला आहे. महाराष्ट्रातील अपूर्ण प्रकल्पांच्या पुर्ततेसाठी राज्याने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.  सिंचनाच्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी एकत्र काम करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 ना. गिरीष महाजन यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, राज्यात एक लाख कोटी रुपयांचे प्रकल्प 
उभारणी सुरु अवस्थेत आहेत. ते पूर्ण करण्यासाठी केंद्रानेही निधी द्यावा. तापी महाकाय पुनर्भरण योजनेमुळे या परिसरात परिवर्तन होईल, असे त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या भल्यासाठी या प्रकल्पाला कार्यान्वित करा, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत  राष्ट्रीय जलविज्ञान संस्थान रुडकीचे निर्देशक आर. डी. सिंग,  डॉ. दीपांकर साहा यांनी  सविस्तर सादरीकरण केले.