Breaking News

डंपर-तवेराकारचा अपघात; 11 जखमी; 2 गंभीर


 जळगाव/प्रतिनिधी। 12 - येथून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील येथील अजिंठा चौक अपघाती मृत्यूचा केंद्रबिंदू म्हणून नवीन वर्षात ओळखला जाऊ लागला आहे. या ठिकाणी सध्या दररोज अपघात होऊन मृतदेह अथवा जखमींना उचलावे लागत असल्याचे येथील रिक्षाचालकांनी सांगितले. कालिंकामाता चौकातून भरधाव येणार्‍या वाळूच्या डंपरने चौकात तवेरा कारला चेंडूप्रमाणे उडवून दोनशे फुटांवर उभ्या असलेल्या नव्या कोर्‍या ट्रकला मधोमध धडक देत ट्रकचे दोन भाग केल्याचा थरार काल पहाटे चारला अजिंठा चौकात असलेल्या रिक्षाचालकांनी अनुभवला. तवेरा कारमधील अकरा जण आणि उभ्या ट्रकमधे झोपलेला क्लीनर जखमी झाले. शहर व महामार्गावरील खड्ड्यांमुळे काही दिवसांपासून अपघात होऊन दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागत होते. मात्र, आता महामार्गाची दुरुस्ती झाल्यानंतर आंतरराज्यीय वाहतुकीच्या वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यात खास करून गुजरातमधील ट्रक आणि वाळूच्या डंपरचा प्रचंड वेग महामार्गावर मृत्यू घेऊन ये-जा करीत आहे. काल पहाटे 3.50 मिनिटांनी कालिंकामाता मंदिराकडून सुसाट येणार्‍या वाळू डंपरने (जीजे 6- बीवाय 6337) अजिंठ्याकडून शहरात दाखल होत असलेल्या तवेरा कारला (एमएच 19- एएक्स 4572) जोरदार धडक दिली. त्यात तवेरा कारमध्ये सोलापूरहून आलेल्या अकरा बंगाली कामगारांना घेऊन अजिंठा चौकातच तीन कोलांटउड्या घेऊन तवेरा कारचा चक्काचूर झाला. यात दोन जण गंभीर झाले; तर नियंत्रण सुटल्यावर सुसाट डंपर अजिंठा चौफुलीच्या उजव्या बाजूस असलेल्या हॉटेल मानससमोरील उभ्या ट्रकवर धडकला. डंपरची धडक इतकी जोरदार होती, की उभ्या ट्रकला मधोमध तोडून डंपर थांबला. ट्रकमध्ये झोपलेले चालक व क्लीनर थोडक्यात बचावले. तवेरा कारमधील जखमी आबिदखान अहमदखान पठाण (वय 40) यांच्या तक्रारीवरून डंपरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यास अटक केली आहे.
अपघातातील जखमी 
आबिदखान अहमदखान (वय 40), पुलास ख्वाडा (वय 34), गोपीनाथ बेहरा (वय 33), कार्तिक शहा (वय
25), अर्शद खान (वय 30), सुबीर कालीप्रसाद (वय 30), अजित जाना (वय 25), रोहित एस. के. (वय
30), रोलीक खान (वय 30), सुमंत कांत (वय 25), वाहीद मलिक (वय 25), लुकमान खान (वय 26),
बापन सावंत (वय 23)